साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान - जळगावात साहित्यिकांचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:28 PM2018-11-11T12:28:56+5:302018-11-11T12:30:00+5:30
अजूनही मोठ्या संख्येने आहेत वाचक
जळगाव : साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान आहे. लोक हल्ली वाचत नाहीत, असे सर्रास म्हटले जात असले तरीही मोठ्या संख्येने वाचक अजूनही टिकून आहेत, हे दिवाळी अंकांची संख्या व त्यांच्या खपावरून दिसून येते असा सूर मान्यवर साहित्यिकांनी बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ‘लोकमत’ शहर कार्यालय सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केला.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन पाटील, कवी अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर यांनी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी या मान्यवरांनी शहर कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधत दिवाळी अंकाच्या बाबत आपले मत व्यक्त केले.
दिवाळी अंकातील दर्जेदार साहित्यामुळे मुळे नवीन स्फुर्ती मिळत असल्याचाही सूर या साहित्यिकांनी यावेळी व्यक्त केले.
प्रा.किसन पाटील
लहानपणी आमच्या गावातील वाचनालयात दिवाळी अंक यायचे. तसेच ज्येष्ठ बंधू शिक्षण घेत होते. ते देखील ते दिवाळी अंक आणायचे. त्यामुळे लहानपणीच दिवाळी अंकाशी परिचय झाला. दिवाळी अंकाच्यानिमित्ताने चांगली रंगीत छायाचित्र तर बघायला मिळायचीच पण काही दिवाळी अंकांमधून वात्रटिकाही वाचायला आनंद यायचा. सुरूवातीला त्यातील उपरोध कळायचा नाही. मात्र नंतर हळूहळू त्यातील उपरोध, गंमत कळायला सुरूवात झाली. दिवाळी अंक ही एकूणच भारतीय संस्कृतीला मराठीची देण आहे. अपवाद वगळला तर दिवाळी अंक हे मराठीतच निघातात. आजच्या स्थितीत सुमारे ४०० ते ४५० दिवाळी अंक निघतात. साहित्य निर्मिती ही स्वान्त सुखाय असते. मात्र आत्मनिष्ठेकरून हे साहित्य समाजनिष्ठेकडे जाते. तेव्हा दिवाळी अंकांचे माध्यम त्यासाठी अधिक उपयोगी ठरते. त्यामुळे साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचेही योगदान मोठे आहे.
प्रकाश किनगावकर
लेखक, कवी लिहितो, मात्र त्याला लगेच प्रसिद्धी मिळत नाही. एखाद्या कवीला कविता संग्रह प्रसिद्ध करायला १०-१५ वर्ष वाट पहावी लागते. माझा पहिला कविता संग्रह १८ वर्षांनी प्रसिद्ध झाला. मात्र दिवाळी अंकामुळे साहित्याला लगेच प्रसिद्धी मिळते. अनेक दिवाळी अंकांसाठी चांगले साहित्य राखून ठेवले जाते. मोठ्या दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रकाशित होणे हा वेगळाच आनंद आहे. दिवाळी अंकातून चांगले साहित्य वाचकांपर्यंत जाते. लोक वाचतात. वेगवेगळे विषय अंकात असतात.
अशोक कोतवाल
उत्तम दिवाळी अंक हे उत्तम साहित्य उत्तम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम साधन असते. मी लिहायला सुरूवात केली तेव्हा खूप मासिकं होते. तेव्हा नामांकित मासिकात आपले साहित्य प्रसिद्ध व्हावे, असे वाटायचे. दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रसिद्ध व्हायचे तेव्हा फराळापेक्षाही दिवाळी अंकाची वाट बघायचो. अजूनही ‘दीपोत्सव’सारखे चांगले दिवाळी अंक साहित्यिकांना प्रेरणा देतात. उत्साह निर्माण करतात. तसेच प्रकाशकही ते दिवाळी अंक अधिकाधिक चांगले करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. वाचनीय अंक असतात. वाचकवर्गही दर्जेदार असतो. लोक वाचत नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे. लोक पुस्तक, दिवाळी अंक विकत घेतात. विशिष्ट विषयाला वाहिेलेले दिवाळी अंक हे फॅड आहे. मात्र काही अंकांनी दर्जा, वैशिष्ट्य जपले आहे.