अवकाळी पावसामुळे लिंबू बागांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 10:40 PM2021-05-15T22:40:07+5:302021-05-15T22:40:38+5:30
पारोळा तालुक्यात विविध ठिकाणी पाऊस पडून झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत तर काही ठिकाणी घरावरचे छप्पर उडून गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : महाळपूर ता. पारोळा येथे वादळी पावसामुळे ३ ते ४ घरांवर झाडे कोसळली. शिवाय दोन घरांचे छतावरील पत्रे उडून गेले. एवढेच नाही तर म्हशींच्या गोठ्यांवरील पत्र उडाल्याने नुकसान झाले. गावात एक मोठे झाड इलेक्ट्रीक तारांवर पडले.
महाळपूर येथे वादळात साहेबराव भिल, पीरण सौंदणे, विलास पाटील , सुनिल पाटील, संजय पारधी, ईश्वर पारधी, संजय भिल, राजेंद्र भिल, भिकुबाई पाटील, रवींद्र पाटील, विनोद पाटील, मधुकर वाल्हे , कैलास पाटील, गिरीश पाटील, धर्मेंद्र पाटील, महादेव मंदिर, कैलास पाटील, विशाल पाटील या ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सरपंच सुधाकर पाटील यांनी लगेच नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तहसीलदार अनिल गवांदे यांना वादळात नुकसान झाल्याची माहिती देत नुकसानीचा पंचनामे करण्याची विनंती केली. तामसवाडी , देवगाव, जोगलखेडे, मुंदाणे , उडणी दिगर, टोळी,यासह अन्य गावातील लिंबू या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे झाडावरील लिंबू तर गळून पडले. वादळामुळे अनेक लिंबू चे अनेक झाडे उन्मळून पडले आहेत.
दळवेल येथे नेटशेडचे मोठे नुकसान
दळवेल गावाला नेटशेड चे लाखो रुपयांचे नुकसान यात झाले. यात शेतकरी उज्जनबाई अभिमन पाटील व अभिमन नामदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे या नेटशेड चे नुकसान झाले आहे.
वीजेचे खांबासह झाडे उन्मळली
पारोळा तालुक्यात दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास मुसळधार बेमोसमी पावसाने वादळा विजांच्या कडकडाटासह अर्धा तास हजेरी लावली.
चौफेर या वादळी पावसाने हजेरी लावली. भोलाने, शेवगे बु., टोळी, या गावात वादळ खूप जोरात होते. पिंप्री प्र. उ., खोलसर, वंजारी, दळवेल, विचखेडे, जोगलखेडे, भोकरबारी यासह अन्य भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे पारोळा कजगाव रोडवर झाड पडल्याने वाहतूक काही वेळ थांबली होती तर तामसवाडी देवगाव रस्त्यावरही झाड आडवे पडल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती.