ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 07:59 PM2021-01-02T19:59:41+5:302021-01-02T20:01:23+5:30
धुपे खु., ता. चोपडा येथे गावठी हातभट्टी तयार करण्याचा अड्डा चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून उध्वस्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : धुपे खु., ता. चोपडा या तापी नदीच्या काठावरील गावाच्या शिवारात गावठी हातभट्टी तयार करण्याचा अड्डा चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून उध्वस्त केला. या धाडीत तीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, शनिवारी दुपारी २ वाजता धुपे खु. ता. चोपडा शिवारात तापी नदीचे पात्रात तातु उत्तम सोनवणे (४०, धुपे खु.), नारायण बाजीराव अहिर (५२, धुपे चोपडा) हे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे ३ हजार लिटर कच्चे रसायन व तीस किलो गुळ बाळगुन गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असताना मिळून आले.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात हवालदार मनेष वसंत गावीत यांच्या फिर्यादीवरून तातु उत्तम सोनवणे (४०, धुपे खु)., नारायण बाजीराव अहिर (५२, धुपे) यांच्याविरुद्ध मुंबई प्रोव्ही ॲक्ट क ६५ ( फ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. डी. वसावे, हवालदार मनीष गावित, किशोर शिंदे, विनोद पाटील यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यातील दोघां आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास हवालदार संजय येदे हे करीत आहेत.