.२८ मार्चपर्यंत करा बँकांची कामे पूर्ण, सलग चार दिवस सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:35 PM2018-03-17T12:35:38+5:302018-03-17T12:35:38+5:30
मार्च अखेरमुळे विम्याचे हप्ते, कर भरणाही करावा लागणार पूर्ण
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १७ - मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सलग चार सुट्या घेऊन येत असल्याने बँकिंग व्यवहारासह विमा हप्ते, कर भरणा हे २८ मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. कारण २९ मार्च ते १ एप्रिल सलग चार दिवस शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत.
सध्या बँकांसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मार्च अखेरमुळे आर्थिक कामकाज पूर्ण करण्याची धावपळ सुरू आहे. ही धावपळ दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व त्यातल्या त्यात शेवटच्या तीन-चार दिवसात अधिक वाढते. मात्र यंदाचा मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सलग चार दिवस सुट्या घेऊन आलेला आहे. यामुळे आता एक आठवडा अगोदरच शेवटच्या आठवड्यातील लगबग दिसण्याची चिन्हे तर आहेच, सोबतच सर्वांची चिंताही वाढत आहे.
२९ मार्च रोजी भगवान महावीर जयंती, ३० मार्च रोजी गुडफ्रायडे, ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस व १ एप्रिल रोजी रविवारची सुट्टी अशा सलग चार लागून सुट्या आल्या आहेत.
या चारही दिवस बँका, विमा कार्यालय, आयकर कार्यालय अर्थात सर्वच शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे ग्राहक, व्यापारी, नोकरदार अशा सर्वांना २८ मार्चपर्यंत वरील सर्व कार्यालयतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यातच मार्च अखेर असल्याने आर्थिक व्यवहार व संबंधित कामे पूर्ण न झाल्यास विनाकारण दंड अथवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.