चॉपरचा धाक दाखवून लुटणारा ‘माकोडा’ जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:27+5:302021-01-01T04:11:27+5:30
जळगाव : मेहरूण चौपाटीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरूण-तरूणीस चॉपर लावून लुटल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी शोएब शेख ...
जळगाव : मेहरूण चौपाटीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरूण-तरूणीस चॉपर लावून लुटल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी शोएब शेख उर्फ माकोडा शेख नुरूद्दीन (२२, रा. टिपू सुलतान चौक, तांबापूरा) याला भुसावळातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.
आदर्शनगरातील इंद्रजित देशमुख हा १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्याच्या मैत्रिणीसोबत मेहरूण चौपाटीवर पायी फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी दुचाकीवरून राहुल गवळी, शोएब शेख व शकील शहा हे तिघे आले व त्यांनी इंद्रजित व त्याच्या मैत्रिणीस चॉपर लावून मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी राहुल राजू गवळी याला १७ नोव्हेंबर रोजीच अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, दुसरा संशयित शोएब उर्फ माकोडा हा भुसावळात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. बुधवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांनी भुसावळातून माकोडा याला अटक केली आहे.