माकू व भुऱ्या स्थानबद्ध, दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई
By विजय.सैतवाल | Published: January 30, 2024 04:57 PM2024-01-30T16:57:37+5:302024-01-30T17:01:49+5:30
ठाणे व कोल्हापूरला रवानगी.
विजयकुमार सैतवाल,जळगाव : अमळनेर व जामनेर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत त्यांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. रमण ऊर्फ माकू बापू नामदास (२२, रा. मुठेचाळ, अमळनेर) व योगेश ऊर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (३२, रा. बजरंगपुरा, ता. जामनेर) अशी स्थानबद्ध केलेल्यांची नावे आहेत.
अमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार रमण ऊर्फ माकू नामदास याच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरी असे चार गुन्हे व एक अदखलपात्र गुन्हा दाखल असण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, तसेच जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील योगेश ऊर्फ भुऱ्या चव्हाण याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, दारूबंदी कायद्यानुसार तसेच जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असून चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
या दोघांची दहशत वाढत असल्यामुळे त्यांच्यापासून धोका निर्माण झाला. त्यामुळे अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी रमण नामदास व जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी योगेश ऊर्फ भुऱ्या चव्हाण याच्या एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शााखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शख इब्राहीम, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी पाहिले. योगेश ऊर्फ भुऱ्या चव्हाण याला ठाणे तर रमण ऊर्फ माकू यांची कोल्हापूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.