मलायका ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:12 PM2019-06-26T12:12:11+5:302019-06-26T12:13:07+5:30
१९४५ च्या सुमारास स्वाहिली भाषेत ‘मलायका..’ नावाचं एक गीत अॅडम सलीम या आफ्रिकन माणसाने लिहिलं.
'दामिनी' चं गाणं आठवतंय? ‘गवाह है ... चाँद तारे गवाह है’ ते परवा अचानक (आणि चुकून) ऐकण्यात आलं. मला अचानक जाणवलं की, ही चाल ओळखीची वाटतेय. दामिनीचे संगीतकार बघता कोणतीही चाल 'ढापलेली'च असणार हे उघड होतं; पण कुठून? आठवणीला ताण देता देता फार पूर्वीचं एक मराठी भावगीत आठवलं. आण्णा, अर्थात सी .रामचंद्रांचं ‘पाचोळे... आम्ही हो पाचोळे’ म्हटलं, चला- सुटलं कोडं! पण तसं नव्हतं....आण्णांनी दिलेली ती चाल जुनी, सत्तरच्या दशकातली असली तरी ती उघडपणे पाश्चात्य ढंगाचीच दिसत होती. मग या चालीचा वेध घेत मागे गेलो. मोठी मनोरंजक माहिती मिळाली... १९४५ च्या सुमारास स्वाहिली भाषेत ‘मलायका..’ नावाचं एक गीत अॅडम सलीम या आफ्रिकन माणसाने लिहिलं. त्याला चालही दिली. ते एक प्रेमगीत आहे. ते बरंच गाजलं. नंतर तेच गाणं ‘मिरियम मकेबा’ या वलयांकित कृष्णवर्णी गायिकेने गायलं. कालांतराने ते ‘बोनी एम’ या प्रसिद्ध वाद्यवृंदानेही सादर केलं. साहजिकच ते अधिकाधिक प्रसिद्ध होत गेलं. इतकं, की नैरोबी च्या एका संगीत ‘कन्सर्ट’ मध्ये ते दस्तुरखुद्द लतादीदींनी म्हटलं होतं. त्यांच्या आवाजात तर ते भलतंच गोड वाटतं ऐकायला! ती चाल जशीच्या तशी नदीम श्रवण ने १९९३ ला दामिनी मधे वापरली. ती चोरी बेमालूम केली, पण अनेकांच्या लक्षातही आली...गंमत अशी की, सी.रामचंद्रासारख्या बुजुर्ग संगीतकाराने याच गाण्याची ७० च्या दशकात केलेली चोरी मात्र फारशी चर्चेत कधी आली नाही. त्यांचं एरव्हीचं दिगंत कर्तृत्व लक्षात घेता हे आण्णा चितळकरांचं ‘शॉप लिफ्टिंग’ म्हणावं लागेल !!
- सुशील अत्रे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ