मालती नेहतेंच्या वारसांना मिळणार ५ लाखाची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 10:46 PM2021-01-29T22:46:26+5:302021-01-29T22:46:26+5:30

औरंगाबाद खंडपीठाचा निकाल : निकालापासून चार महिन्यात द्यावी लागणार रक्कम

Malati Nehten's heirs to get Rs 5 lakh compensation | मालती नेहतेंच्या वारसांना मिळणार ५ लाखाची नुकसान भरपाई

मालती नेहतेंच्या वारसांना मिळणार ५ लाखाची नुकसान भरपाई

Next

जळगाव : भुसावळ येथील मालती नेहेते या वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी निकाल देताना जिल्हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा आढळून आला. नेहेते यांच्या वारसांना पाच लाखांची नुकसान भरपाई निकाल लागल्यापासून चार महिन्यात शासनाने अदा करावी, असा निर्णय दिला आहे.

मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने जळगाव जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले होते़ कोरोना काळात जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल असलेल्या मालती नेहेते (८२, रा. भुसावळ) या २ जून २०२० रोजी रुग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर १० जूनला नेहेते यांचा मृतदेह रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या घटनेने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
जनहित याचिका केली दाखल

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मालती नेहेते यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे नेहेते यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, कमला बिऱ्हाडे (रा.अमळनेर) आणि रफीक तडवी (रा.उटखेडा, ता. रावेर) यांनी औरंगाबाद खंडपीठात २५ जून २०२० ला जनहित याचिका दाखल केली. यात नेहेते यांच्या वारसांना ३० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती.

खंडपीठाने दिला निकाल
औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती श्रीकांत कुळकर्णी व न्या. एस.व्ही. गंगापूरवाला यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर नुकताच या प्रकरणी निकाल दिला आहे. यात राज्य शासनाने मयत मालती नेहेते यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. ही भरपाई निकालापासून चार महिन्यात देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर घडलेल्या घटनेच्या चौकशीबाबत नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार आढळून आल्या दोषींवर राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही म्हटले आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. गायत्री सिंग व अ‍ॅड. अंकित कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले.

 

 

Web Title: Malati Nehten's heirs to get Rs 5 lakh compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.