बालकांच्या आरोग्यासाठी पुरूषांना संगोपनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:03 PM2020-03-08T12:03:41+5:302020-03-08T12:04:22+5:30
अंगणवाडीस्तरावर होणार पुरूषांची पाककला स्पर्धा
जळगाव : बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी केवळ आई नव्हे तर वडिलांचाही सहभाग वाढून बालकांना योग्य पोषण वेळेवर मिळावे, यासाठी ८ ते २२ मार्च दरम्यान पोषण पंधरवडा राबविला जाणार आहे़ यात विशेष बाब म्हणजे पुरूषांना अधिकाधिक सहभागी करून घेत, त्यांना संगोपनाचे धडे देण्याबरोबरच त्यांची अंगणवाडीस्तरावर आता पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे या पंधरवाड्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यात पुरूषांची पाककला स्पर्धा यासह शून्य ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांना आहारकसा भरवावा ? याबाबतचे पुरूषांना प्रशिक्षण तसेच स्पर्धा व मुलांच्या पोषणाबाबत पुरूषांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे़
यासह जनजागृतीपर रॅलीही काढण्यात येणार आहे़ त्यातही पुरूषांचाच अधिक सहभाग असावा असे नियोजन महिला व बालकल्याण विभागातर्फे केले जात आहे़
आई सोबतच वडिलांना मुलांच्या जेवणाचे व त्याच्या संगोपनाचे महत्त्व कळावे, त्यांनीही यासाठी वेळ काढावा यासाठी प्रोत्साहन म्हणून या स्पर्धा असून या स्पर्धांनंतर प्रोत्साहनपर पारितोषिकही विभागातर्फे देण्यात येणार आहे़
डबापार्टीची तृप्ती योजना
गरोदर महिलांना योग्य पोषण मिळावे, संतुलीत व सर्व आहार एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी या महिलांची अंगणवाडीमध्ये डब्बा पार्टी अर्थात अशा सर्व महिलांनी एकत्रित येऊन घरचे जेवण अंगणवाडीत एकत्रित घ्यायचे आहे़ यावेळी आवश्यकत्या गोळ्या या अंगणवाडी सेविकांकडून या महिलांना त्याच ठिकाणी देण्यात येणार आहे़ बऱ्याच वेळा गोळ्या देऊनही महिला घेतात किंवा नाही याबाबत साशंकता असायची आता मात्र, समोरच या गोळ्याही दिल्या जाणार आहे़ तृप्ती योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ यात प्रोत्साहन म्हणून अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एका आठवड्यात अंगणवाड्यांमध्ये जावून या डबा पार्टीत घरचे जेवण आणून सहभाग नोंदवायचा आहे़ जेवण आणा किंवा फळे आणा, असा हा उपक्रम ९ मार्चपासून सर्व अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात येणार आहे़
बाळाच्या संगोपनात वडिलांचा सहभाग तसा कमी आढळतो़ बाळाला पोषण आहार देण्यामध्ये नेहमी आईचाच पुढाकार जाणवतो, अशा स्थितीत केव्हाही गरज पडल्यास पुरूषांनाही ते जमायला हवे व त्यांनीही बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी नेहमी पुढाकार घ्यावा, यासाही या विविध स्पर्धा व उपक्रम आहेत़ यात अधिकाधिक पुरूषांनी सहभागी व्हावे.
-आऱ आऱ तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी,जि़प़