मालेगाव येथे बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी अखेर बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:46 PM2020-05-11T12:46:49+5:302020-05-11T12:47:01+5:30
कारवाई : पत्रकारांना माहिती पुरविल्याचा ठपका
जळगाव : मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना पोलिसांविषयी खोटी अफवा पसरवून भीतीची भावना निर्माण केली म्हणून पारोळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंकज मकराम राठोड यांना बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी याबाबतचे आदेश शनिवारी उशिरा जारी केले. पोलीस दलाची बदनामी करणारी माहिती पत्रकारांना पुरविल्याचा ठपका राठोड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मालेगाव येथे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने स्थानिक बंदोबस्त अपूर्ण पडत असल्याने जळगावहून १३ एप्रिल रोजी १०० पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले होते. त्यातील पंकज राठोड यांनी जळगाव येथून आलेल्या पोलिसांना कुठलीही सुविधा मिळत नाही, त्यामुळे राजीनामा द्यावा की पळून जावे अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याबाबत माहिती नाशिक येथील पत्रकारांना पुरविली होती. त्याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीत ही माहिती राठोड याने पुरवून पोलीस दलाची बदनामी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीची भावना निर्माण केल्याचे उघड झाले. त्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाला होता. त्यानुसार डॉ.उगले यांनी पंकज राठोड यांना सेवेतून बडतर्फ केले. मालेगाव येथे असताना तेथून पळून आलेल्या पाच पोलिसांना याआधीच निलंबित करण्यात आले आहे. तेथे तैनात असलेल्या बंदोबस्त शनिवारीच माघारी आला असून एरंडोल येथे ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.