अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मामास १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 08:52 PM2020-01-07T20:52:17+5:302020-01-07T20:52:24+5:30
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : सरकारपक्षाने तपासले १३ साक्षीदार
जळगाव- तुला व तुझ्या कुटूंबीयांना मारून टाकेल अशी धमकी देऊन वारंवार नातलग अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात आरोपी मामा गणेश पोपट खवले (वय-२४ वर्ष, रा़ म्हसला ता़ सिल्लोड जि़ औरंगाबाद) यास मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़वाय़ लाडेकर यांनी दोषी धरून १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़
भडगाव तालुक्यातील पीडित मुलीचे वडीलांचे निधन झाल्यानंतर शेती कामात सहकार्य व्हावे यासाठी पीडीताच्या आईने गणेश पोपट खवले यास गावात बोलवून घेतले होते़ मात्र, गणेश याने तुला व तुझ्या कुटूबींयाना मारून टाकेल, अशी धमकी देत पीडीतेवर वांरवार अत्याचार केले़ काही दिवसांनी पोट दुखु लागल्यानंतर तिची रूग्णालयात तपासणी केली असता पीडीता ही गरोदर असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर कुटूंबीयांनी विचारपूस केल्यानंतर तिने वांरवार झालेल्या अत्याचाराची संपूर्ण हकीकत सांगितली़ त्यानंतर पीडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६ व ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ३, ४, ५ व ६ अन्वये प्रमाणे गणेश खवले याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अखेर तपासानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक रवींद्र जाधव यांनी भडगाव न्यायालयात दाखल केले़ त्यानंतर सुनावणीकामी हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़वाय़लाडेकर यांच्या न्यायालयात आला़
१३ साक्षीदार तपासले
अत्याचार प्रकरणातील खटल्यात १३ साक्षीदार तपासण्यात आले असून त्यात पीडितेची आई, पीडिता तसेच वैद्यकीय अधिकारी व डी़एऩए तज्ञ आदींच्या साक्षी त्यामध्ये महत्वपूर्ण ठरल्या़ तर न्यायालयाने सरकारपक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून गणेश पोपट खवले याला दोषी धरून मंगळवारी शिक्षा सुनावली आहे़ सरकारपक्षातर्फे अॅड़ प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले़
अशी सुनावली शिक्षा
नातलग अत्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी न्या़ पी़वाय़ लाडेकर यांनी निकला दिला असून त्यामध्ये आरोपी गणेश खवले याला १४ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ त्यामध्ये भादवी कलम ३७६ अन्वये प्रमाणे १० वर्ष सश्रम कारावास, ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्यांची साधी कैद, भादवी कलम ५०६ अन्वये प्रमाणे ३ वर्ष सश्रम कारावास, १ हजार दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची साधी कैदेची शिक्षा तर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ३, ४, ५ व ६ अन्वये १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तर ५ हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास ६ महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे़ ही शिक्षा एकत्र भोगावयाची आहे़