तोंडापूर ग्राम पंचायत अपहारप्रकरणी संशयित फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:44 PM2018-08-29T17:44:19+5:302018-08-29T17:46:06+5:30
तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यासह सरपंचाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
पहूर, ता जामनेरी, जि.जळगाव : तोंडापूर ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाचा १५ लाख ६३ हजार १०० रूपयांचा जमा विकास निधी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व विद्यमान सरपंचांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व पदाधिकारी दुसºया दिवशीही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनुसार, सन २०१५ मध्ये तोंडापूर ग्रामपंचायतीसाठी विकास कामे करण्यासाठी १५ लाख ६३ हजार १०० रुपये रक्कम शासनाकडून मंजूर होऊन जमा करण्यात आली होती. शासनाकडून आलेला निधी काढण्याची व शासनाच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मांगोराम रामू सांळूखे व सरपंच प्रभाकर काशिनाथ सपकाळ यांची होती. या दोघांनी या शासनाच्या नियमांना धाब्यावर बसविले.
दोघांनी संगनमत करून २०१६ ते २०१७ या आर्थिक वर्षांत विकास कामांच्या खर्चाचे कोणतेही अंदाजपत्रक तयार न करता त्या अंदाज पत्रकात फेरफार करून विकास कामांच्या बिलाचा खोटा दस्तऐवज तयार केला व या पध्दतीने १ एप्रिल २०१७ ते १९ मार्च २०१८ या काळात ही रक्कम या दोघांनी हडपल्याचे केलेल्या चौकशीतून उघड झाले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी तोंडापूर ग्रामपंचायत मध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शासनाकडे केल्या होत्या. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देवचंद सोनू लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन ग्रा.वि.अधिकारी मांगोराम रामू साळुंखे व सरपंच प्रभाकर काशिनाथ सपकाळ यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही संशयित फरार आहेत.