ममुराबाद- आसोदा रस्त्यावरील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:50+5:302021-05-12T04:16:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : जिल्हा परिषद गटातील ममुराबाद आणि आसोदा या दोन मोठ्या गावांना जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : जिल्हा परिषद गटातील ममुराबाद आणि आसोदा या दोन मोठ्या गावांना जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे अतोनात हाल होत असताना लोकप्रतिनिधींनीही याकडे मुद्दाम काणाडोळा केल्याचा आरोप होत आहे.
ममुराबादहून आसोदा गावाकडे जाण्यासाठी असलेल्या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याने भादली, शेळगावमार्गे यावल तसेच कडगाव, तरसोद, नशिराबाद गावाकडे कमी वेळात जाता येते. त्याचप्रमाणे तिकडून कानळदा, विदगाव, डांभुर्णी, किनगाव, मनुदेवी देवस्थानाकडे कमी वेळात येणे शक्य होत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची या रस्त्यावर कायम वर्दळ असते. परंतु, या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना काही महिन्यांपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी शेतांमधून बाहेर पडणारे पाणी साचल्याने या रस्त्याची पार वाट लागली आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात येणारी दुरुस्ती अगदीच थातुरमातुर पद्धतीची असल्याने लहान खड्डे आता मोठे झाले आहेत. लौकी नाल्यावरील खोल पुलाच्या जागी उंच पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असले तरी पुलाकडून ममुराबाद गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर लौकी नाल्याशेजारी अजूनही संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. एकूण स्थिती लक्षात घेता तात्पुरती दुरुस्ती हाती न घेता ममुराबाद- आसोदा रस्त्याचे नव्याने मजबुतीकरणासह डांबरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.
-------------
फोटो-
ममुराबाद ते आसोदा रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांचे हाल होत आहेत. (जितेंद्र पाटील)