ममुराबाद- आव्हाणे रस्त्याच्या कामापूर्वीच शेकडो झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:10+5:302021-04-21T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : आव्हाणे गावाकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले असले तरी निविदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : आव्हाणे गावाकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले असले तरी निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच रस्त्याचे काम कधी सुरू होईल याचीही कोणतीच शाश्वती नाही. तत्पूर्वीच या रस्त्यालगतची शेकडो डेरेदार झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. त्याद्वारे लाकडांच्या तस्करीला वेग आला आहे.
ममुराबादहून आव्हाणे गावाकडे जाण्यासाठी सुमारे साडेपाच किलोमीटर अंतराचा मधला रस्ता आहे. ग्रामीण मार्गात रूपांतर झाल्यानंतर त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मजबुतीकरणासह डांबरीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नुकतेच मंजूरसुद्धा झाले आहे. सदरचा रस्ता पूर्णत्वास आल्यानंतर ममुराबाद व आव्हाणे भागातील शेतकऱ्यांचे दरवर्षी पावसाळ्यात होणारे हाल थांबणार असून दोन्ही गावांमधील दळणवळण सुविधा वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे. दरम्यान, सदर रस्त्याचे काम मंजुरीच्या पुढे सरकलेले नसताना विशेषतः ममुराबाद शिवारात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अनेक वर्षे जुनी झाडे तोडली जात आहे. संबंधित शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखविले जात आहे. वन विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे तोडल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शिल्लक राहिलेल्या बुंध्याला आगी लावण्याचा प्रकारही आढळून आला आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
---------------------------
फोटो-
ममुराबाद- आव्हाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात नसताना अनेक वर्षे जुनी डेरेदार झाडे जमिनीपासून तोडण्यात आली आहेत. (जितेंद्र पाटील)