ममुराबाद - नांद्रा रस्त्यालगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:16+5:302021-04-06T04:15:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : शिवारातील नांद्राखुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ठिकठिकाणी उभे असलेले लोखंडी वीजखांब जमिनीकडे झुकले आहेत. महावितरणकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : शिवारातील नांद्राखुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ठिकठिकाणी उभे असलेले लोखंडी वीजखांब जमिनीकडे झुकले आहेत. महावितरणकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्याने वावरणाऱ्या शेतकऱ्यांसह वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
नांद्राखुर्द गावाकडे जाण्यासाठी ममुराबादहून मधला कमी अंतराचा रस्ता आहे. याच रस्त्यालगत असलेल्या वीजवाहक तारा सध्या धोकादायक ठरल्या आहेत. महावितरणकडून होत असलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे या भागातील बहुतांश लोखंडी खांब जमिनीकडे झुकले आहेत. विजेच्या तारा अगदी हाताच्या अंतरावर लोंबकळताना दिसत आहेत. अनावधानाने स्पर्श झाला तरी विजेचा धक्का लागून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता बऱ्याच ठिकाणी निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी शेताच्या बांधावर त्यांची जनावरे चरण्यासाठी सोडतात. लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांमुळे मुक्या जनावरांच्या जीवालासुद्धा धोका संभवतो. महावितरणकडून शेतकऱ्यांकडील थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी तत्परता दाखविण्यात येत आहे तेवढी धोकादायक खांब बदलण्यासाठी आजतागायत घेण्यात आलेली नाही. महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.
--------------
फोटो-
ममुराबाद - नांद्राखुर्द रस्त्यालगत महावितरणच्या दुर्लक्षामुळे झुकलेले खांब असे धोकादायक स्थितीत उभे आहेत. शेतकऱ्यांसह वाहनधारकांच्या जीवितास त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. (जितेंद्र पाटील)