ममुराबादच्या ग्रा.पं. निवडणुकीत चौधरी परिवाराचे वर्चस्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:45+5:302021-01-21T04:15:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी बहुतांश वॉर्डात नवख्या उमेदवारांना संधी दिली असली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी बहुतांश वॉर्डात नवख्या उमेदवारांना संधी दिली असली तरी गावाच्या राजकारणावर पूर्वापार वरदहस्त असलेल्या चौैधरी परिवाराने यावेळीही आपले वर्चस्व कायम राखले आहे.
ममुराबाद ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र एकूण सहा वॉर्डात विस्तारले आहे. त्यापैकी वॉर्ड एक आणि वॉर्ड सहामध्ये चौधरी परिवाराचे तीन सदस्य एकाचवेळी निवडून आले आहेत. त्यातील हेमंत गोविंद चौधरी हे यंदा सलग सहाव्यांदा विजयी झाले असून यापूर्वी २००३ मध्येही त्यांनी ममुराबाद ग्रामपंचायतीचे सरपंचपदसुद्धा भूषविले आहे. त्यांच्याच कुटुंबातील साधना सुनील चौधरी या यंदा पहिल्यांदा विजयी झाल्या आहेत. हेमंत चौधरी यांचे वडील तसेच साधना चौधरी यांचे सासरे गोविंद हरी चौधरी हे ममुराबादचे सरपंच व जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. मुलगा व सून आता त्यांचा राजकीय वारसा चालवित आहेत. याशिवाय ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्या सुनीता अनंत चौधरी यासुद्धा यंदा तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी यापूर्वी २००१ मध्ये उपसरपंचपद भूषविले होते, तर त्यांचे दीर महेश सोपानदेव चौधरी हेही काहीकाळ ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले आहेत. सुनिता चौधरी यांचे पती अनंत सोपानदेव चौधरी यांनीही गावातील विकास सोसायटी व पीक संरक्षण सोसायटीच्या राजकारणात सक्रिय राहून विविध पदे आतापर्यंत भूषविली आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चौधरी परिवाराने आपली विजयी परंपरा यंदादेखील कायम ठेवल्याने ग्रामस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला.
----------------
फोटो-
हेमंत चौधरी, साधना चौधरी, सुनिता चौैधरी