राष्ट्रवादीच्या तालुका बैठकीत फोटोवरून रंगले मानापमान नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:43+5:302021-02-14T04:15:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जळगाव तालुका आणि धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जळगाव तालुका आणि धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी शहरातील सरदार पटेल सभागृहात पार पडली. या बैठकीत धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांचे मानापमान नाट्य चांगलेच रंगले. कार्यक्रमात व्यासपीठावर असलेल्या बॅनरवर फोटो नसल्याने महाजन चिडले होते. त्यांनी याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमोर उघड नाराजी व्यक्त केली. तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी हे बॅनर जिल्हा कार्यकारिणीचे आहे. त्यामुळे त्यावर महाजन यांचा फोटो नसल्याचे सांगत समजूत काढली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव ग्रामीण मतदारसंघ जळगाव तालुका आणि धरणगाव तालुक्याची बैठक पार पडली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, माजी आमदार अरुणभाई गुजराथी, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, करण खलाटे, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार दिलीप वाघ, संतोष चौधरी माजी आमदार गुरूमुख जगवाणी, धरणगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पा महाजन, ज्ञानेश्वर महाजन, विकास पवार उपस्थित होते.
भुसावळच्या १८ नगरसेवक व १३ माजी नगरसेवकांचा प्रवेश
भाजपच्या भुसावळ नगरपालिकेतील १८ नगरसेवक आणि १३ माजी नगरसेवकांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यात प्रा.सुनील नेवे, भारती रमण भोळे, आरती नेमाडे, पौर्णिमा नेमाडे, शालिनी कोलते, अरुणा सुरवाडे, दिनेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, देवा वाणी, दत्तू सुरवाडे, हेमलता इंगळे, राहुल मकासरे, प्रशांत अहिरे, आशिक मुन्ना तेली, वसंत पाटील, किशोर पाटील, ॲड. बोधराज चौधरी, उपाध्यक्ष शेख शफी शेख अजीज, बापू महाजन, प्रीती पाटील, प्रमोद पाटील, प्रज्ञा सपकाळे, दर्शन चिंचोले, अनिकेत पाटील, आशिष महाजन, पृथ्वीराज पाटील, सुनील बऱ्हाटे, डॉ. नीलेश झोपे, शशांक पाटील, किरण महाजन, नीलेश वारके, चैताली इंगळे, गणेश पाटील, शेख चिराग शेख गुलाब यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शिवसेनेतूनही इनकमिंग जोरात
शिवसेनेचे धनराज रमेश पाटील आणि गोटू पवार यांनीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
प्रास्ताविक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
पराभव विसरा, एकदिलाने कामाला लागा - जयंत पाटील
कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, जळगाव ग्रामीणमध्ये काम करणारे सर्वजण हजर आहेत. त्यामुळे संघटना स्थिर आहे. मागच्या निवडणुकीत झालेला पराभव विसरा आणि एकदिलाने काम करा. पक्षाचा उपयोग करून लोकहित साधा. त्यातूनच पक्ष देखील वाढेल. पाडळसरे हा प्रकल्प अमळनेर, धरणगाव आणि चोपडा या तीन तालुक्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. निधीच्या तरतुदीसाठी देखील प्रयत्न सुरू आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.