मांडकी खु ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 04:27 PM2019-08-08T16:27:12+5:302019-08-08T16:27:38+5:30
ग्रामस्थांचे रस्त्यासाठी तहसीलदारांना साकडे
पाचोरा- तालुक्यातील मांडकी खुर्द गावाला रस्ताच नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याअभावी चिखलातून मार्ग काढत हाल सोसावे लागत आहे. याबाबत मांडकी ग्रामस्थांनी महिलांसह तहसीलदारांना निवेदन देऊन रस्त्यासाठी साकडे घातले आहे.
मांडकी ग्रामस्थांनी तहसीलदार कैलास चावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मांडकी हे गाव गिरणा नदी पात्रालागत असल्याने नदीमुळे गावाला धोका होत असतो. यासाठी शासनाने या गावाचे सन २००८-०९ साली पुनर्वसन केले.गावात भिल्ल आदिवासी वस्ती असून गावाची ४५० लोकसंख्या आहे. गावात एकही पिठाची गिरणी नाही व दुकान दवाखाना नाही. त्यामुळे ग्रामस्थ महिलांना शेजारील पुनगाव येथे जाणे - येणे करावे लागते. गावास जोडणारा रस्ता वारंवार मागणी करूनही झाला नाही. सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून या बहुसंख्य आदिवासी रहिवासी असलेल्या या गावाकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. पिठाची गिरणी किराणा दुकान नसल्याने गावकऱ्यांना बाहेरगावी जावे लागत. त्यातच आजारी रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेण्यास कोणतेही वाहन रस्त्यांवर चालू शकत नाही. यामुळे आमचे जिणे असाह्य झाले आहे. यासाठी तत्काळ रस्ता करावा व गावचे पुनर्वसन करावे अशी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनावर ग्रा प सदस्य चिंतामण पाटील, अनिल परदेशी, देवराज वाघ, सुभाष भिल, राजाराम पाटील, यशोदाबाई भिल, अक्कबाई भिल, मंगलाबाई भिल, मीराबाई मराठे, इंदुबई भिल, सुनंदा मराठे, अक्कबाई भीमराव भिल, आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
दरम्यान तालुक्यात सर्वत्र विकास कामांचा झंझावात चालू असताना मांडकी गावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत असून गावाकडे कुणीही अधिकारी तसेच राजकीय मंडळी फिरकत नाही.यामुळे आमदार तसेच जि. प. सदस्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.