वाहनांना 'जीपीएस' प्रणाली बंधनकारक; तपासणीसाठी भरारी पथके!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 06:57 PM2023-12-29T18:57:06+5:302023-12-29T18:57:20+5:30
गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या परवान्यावरील मालवाहू वाहनांना 'जीपीएस' प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे.
कुंदन पाटील
जळगाव: गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या परवान्यावरील मालवाहू वाहनांना 'जीपीएस' प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांचा वाहन परवाना निलंबन अथवा दहा ते तीस हजारांचा दंड करण्याचा निर्णय जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने नुकताच घेतला.या वाहनांच्या तपासण्यासाठी रण्यासाठी भरारी पथकांची सक्रीय करण्यात आले आहेत.
'जीपीएस' प्रणालीसाठी गौण खनिज उत्खनन परवानगीची प्रक्रिया ऑनलाइन करणे आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याचा निर्णय झाला. महसूल आणि वनविभागाच्या १२ जानेवारी २०१८ च्या राजपत्रातील अधिसूचना, महसूल आणि वनविभागाच्या २३ फेब्रुवारी २०२२ चे पत्र, जळगाव अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
'ईटीपी' क्रमांक सक्तीचा
१ जून २०२२ नंतर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर 'जीपीएस' प्रणाली बसविल्याचे निदर्शनास आल्यास महाखनिज प्रणालीद्वारे वाहतूक करणाऱ्या वाहनांना 'ईटीपी' तयार होणार नाही. 'ईटीपी' क्रमांकाशिवाय असलेला वाहतूक परवाना आणि त्याद्वारे केलेली वाहतूक अवैध समजण्यात येणार आहे.
...तर अवैध वाहतूक
'जीपीएस' प्रणाली बसविण्यासाठी दिलेल्या कालावधीनंतर महसूल यंत्रणेकडून नियुक्त भरारी पथकाकडून अथवा जिल्हाधिकारी नामनिर्देशित करतील, अशा सदस्यांकडून निरीक्षणाच्यावेळी 'जीपीएस' शिवाय गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने आढळून आल्यास उत्खनन व वाहतूक अवैध ठरविली जाणार आहे.