जळगाव जिल्ह्यात आजपासून मास्क वापरणे सक्तीचे - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:01 AM2020-04-27T00:01:19+5:302020-04-27T00:02:06+5:30

अन्यथा पाचशे रुपये दंड

Mandatory use of masks in Jalgaon district from today - Collector's order | जळगाव जिल्ह्यात आजपासून मास्क वापरणे सक्तीचे - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव जिल्ह्यात आजपासून मास्क वापरणे सक्तीचे - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

googlenewsNext

जळगाव : जिल्ह्यात वाढलेले कोरोना बाधित रुग्ण पाहता जिल्ह्यात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे, मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रविवारी दिला.
जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक रविवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
सोशल डिस्टन्सिग न पाळल्यास दुकानदारावर कारवाई
रविवारी जिल्ह्यातील चार रुग्णांचे कोरोणा संसर्ग तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा स्वच्छ धुतलेला रुमाल बांधणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुकानाच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आवश्यक ते चौकोन आखून देणे आवश्यक आहे. ज्या दुकानाच्या बाहेर सोशल डिस्टन्सिग पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या दुकानदारावर ही कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आला.

दुचाकी जप्तीची मोहीम तीव्र करणार
जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. त्याचबरोबर आवश्यकता असेल त्यावेळी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच जे नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करतील वाहनावर दुचाकीवरून फिरतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या दुचाकी जप्त करण्याची मोहीम जिल्ह्यात अधिक गतीने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना बाधित जे रुग्ण आढळलेले आहे ते रुग्ण बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोणाची बाधा झालेली आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावात कोणी बाहेरगावावरून आलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील त्यांनी तात्काळ त्यांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
जिल्ह्यात अमळनेर व भुसावळ येथे रुग्ण आढळून आल्याने या तालुक्यातील नागरिकांनी अधिक सजग राहून लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
देशभरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु काही नागरिक लॉक डाऊनचे पालन करीत नसल्याचे आढळून येत आहे. अशा नागरिकांवर आवश्यक ती कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. त्याचबरोबर कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

Web Title: Mandatory use of masks in Jalgaon district from today - Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव