जळगावात समाजसाक्षीने घडणार ‘मंगल-योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 06:27 PM2017-04-27T18:27:08+5:302017-04-27T18:27:08+5:30

जिल्हाधिकारी मुलीचे मामा म्हणून अंतरपाट धरणार असा हा ‘मंगल-योग’ समाजसाक्षीने घडून येत आहे.

'Mangal-Yoga' will be organized by community activist in Jalgaon | जळगावात समाजसाक्षीने घडणार ‘मंगल-योग’

जळगावात समाजसाक्षीने घडणार ‘मंगल-योग’

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 27 - 20 वर्षापूर्वी शिर्डी येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या मंगल या  मूकबधिर मुलीचा येत्या 30 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील योगेश जैन या मूकबधिर तरुणाशी विवाह होत आहे.  मंत्री कन्यादान करणार तर  जिल्हाधिकारी मुलीचे मामा म्हणून अंतरपाट धरणार असा हा ‘मंगल-योग’ समाजसाक्षीने घडून येत आहे.
20 वर्षापूर्वी शिर्डी येथे बेवारस स्थितीत सापडलेली मंगल ही मूकबधिर मुलगी. तिचा सांभाळ अमरावती जिल्ह्यातल्या वङझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य, दिव्यांग, बेवारस बालगृहात, समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केला.
स्वत:च्या भावना शब्दात व्यक्त न करू शकणा:या मंगलचे शुभमंगल जळगाव जिल्ह्यातल्या रावेरच्या योगेश देवीदास जैन या मूकबधिर तरुणाशी होतोय. ज्या कुण्या जन्मदात्याने जन्म देऊन बेवारसपण दिलं तिथे शंकरबाबा पापळकर या  समाजसेवकाने मंगलचा सांभाळ केला. तिला पित्याची माया देतानाच कायदेशीर पिता म्हणून नावही दिले. तब्बल वीस वर्षाच्या सांभाळानंतर मंगल स्वत:च्या वैवाहिक जीवनाच्या उंबरठय़ावर उभी आहे आणि तिचे लग्न धामधुमीत लावून देण्यासाठी अवघा समाज एकवटलाय.
या लग्नाची गोष्टच न्यारी आहे. मंगलचे कन्यादान राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे करणार आहेत तर मुलीचे मामा म्हणून अंतरपाट धरण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर वधूच्या पाठीशी उभे राहणार आहे. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजीमंत्री  एकनाथराव खडसे हे असतील आणि लग्नाचे कार्यवाहक हे रोटरी क्लब जळगाव वेस्ट आणि इतर सामाजिक संस्था असणार आहेत आणि व:हाडी सारा समाज आहे.
रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे 29 व 30 एप्रिल रोजी मंगल विवाह सोहळा एक लक्षवेधी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा मंगल विवाह सोहळा आगळा वेगळा असून बेवारस  आणि दिव्यांग युवक युवतीच्या आयुष्याकडे समाजासह सरकारचे लक्ष वेधणार आहे. हा मंगल विवाह सोहळा सामाजिक परिवर्तनाचा उंबरठा ओलांडणार आहे.
 बेवारस मतिमंद, दिव्यांग व प्रज्ञाचक्षू मुला मुलींचा सांभाळ करून त्यांना विवाहासाठी शंकरबाबा पापळकर,रा. वङझर जि. अमरावती यांची 20वी मानसकन्या  मंगल आणि रावेर (जि. जळगाव) येथील देवीदास जैन यांचे चिरंजीव योगेश यांचा मंगल विवाह सोहळा 30 एप्रिल  रोजी जळगाव येथे होणार आहे.
29 रोजी रोटरी भवन (मायादेवी नगर) येथे सायंकाळी साडेसहा ते 8 दरम्यान मंगल हिचा हळद व मेहंदीचा कार्यक्रम होईल. 30 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत रोटरी भवन (मायादेवी नगर) येथे  मंगल आणि योगेश यांचा विवाह सोहळा निमंत्रितांच्या उपस्थितीत होईल. सायंकाळी 6 वा. खान्देश सेंट्रल मॉलमध्ये विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ होईल. त्यावेळी वधुवरांची बग्गीतून मिरवणूक निघेल. यावेळी  स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहातील मित्र मंडळी सहभागी असतील. सायं.6.45 ते 7 दरम्यान मंगलाष्टके आणि विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होईल.
 या विवाह सोहळ्यात मंगलचे मामा म्हणून जळगाचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर हे भूमिका निभावतील तर काका म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन व माजी महापौर रमेशदादा जैन हे जबाबदारी पूर्ण करतील. 
मंगल व योगेश यांचा हा विवाह सोहळा शंकरबाबा पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. समाजातील बेवारस मतिमंद, दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षू मुले मुली वयात आल्यानंतर त्यांचे काय होते. त्यांना सुरक्षित जगण्यासाठी किंवा पोषण व निवासासाठी सरकारी योजना नाहीत. ती सुरू करायला हवी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मंगल विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. उपस्थितीचे व सहभागाचे आवाहन मंगल विवाह सोहळ्य़ाचे प्रकल्प प्रमुख डॉ. राजेश पाटील यांनी केले आहे.   

Web Title: 'Mangal-Yoga' will be organized by community activist in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.