मंगळसूत्र पडले अन् खुनाचा झाला उलगडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 10:25 PM2024-04-21T22:25:01+5:302024-04-21T22:25:14+5:30
अनैतिक संबंधातून खून : जिनिंग कामगाराच्या खूनप्रकरणी महिलेच्या पतीला अटक.
विजयकुमार सैतवाल, जळगाव : कानळदा रस्त्यावरील शेतात जिनिंग कामगाराचा खून हा अनैतिक संबंधाच्या वादातून झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून कामगाराचे ज्या महिलेशी संबंध होते तिच्या पतीला तालुका पोलिसांनी अटक केले आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनास्थळी सापडलेले मंगळसूत्र कोणाचे आहे, हे त्याच परिसरातील महिलेने ओळखले अन् या खुनाचा उलगडा झाला व खुनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
कानळदा रस्त्यावरील आसोदा शिवारात लक्ष्मी जिनिंगच्या मागे शेतात सुरेश परमसिंग सोलंकी (२६) या जिनिंग कामगाराचा शनिवार, २० एप्रिल रोजी मृतदेह आढळून आला होता. त्याचा खून झाल्याचे घटनास्थळावरून लक्षात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी जिनिंगमध्येच कामाला असलेल्या कामगाराला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मंगळसूत्र कोणाचे?
घटनास्थळावर पोलिसांना मंगळसूत्र, पैंजण आढळून आले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाचा धागा पकडत या मंगळसूत्राविषयी विचारणा केली. ज्या महिलेचे हे मंगळसूत्र आहे, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या खूनप्रकरणी तिच्या पतीवरही संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
या पूर्वीही दोघांमध्ये वाद, आता खेळच खल्लास
या खुनाचा तपास करताना पोलिसांनी तेथील काही कामगारांनाही विश्वासात घेतले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, खून करणाऱ्याच्या पत्नीचे व मयताचे पाच ते सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. त्याची कुणकूण महिलेच्या पतीला लागल्याने त्याचे व सुरेश सोलंकीचे भांडणही झाले होते. ते कामगारांनी सोडवले. मात्र तरीदेखील शुक्रवार, १९ एप्रिल रोजी रात्री सदर महिला सुरेशला भेटण्यासाठी शेतात गेली. तेथे दोघेही झोपलेले आढळले. त्या वेळी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता महिलेच्या पतीने सुरेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खेळ खल्लास करून टाकला.
दोन तासातच खुनी पोलिसांच्या जाळ्यात
घटनास्थळावर सापडलेल्या वस्तू, मृतदेहाची स्थिती पाहता पोलिसांनी अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याच्या शक्यतेने तत्काळ तपास सुरू केला. यात पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज पाटील, प्रवीण पाटील, केतन पाटील, रामकृष्ण इंगळे, उमेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, नरेंद्र पाटील, तुषार जोशी यांनी दोनच तासात संशयिताला ताब्यात घेत खुनाचा उलगडा केला.