रसायनांमुळे आंबा ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:26 PM2019-06-01T12:26:33+5:302019-06-01T12:27:05+5:30

पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याच्या तक्रारी

Mango is dangerous due to chemicals | रसायनांमुळे आंबा ठरतोय घातक

रसायनांमुळे आंबा ठरतोय घातक

Next

जळगाव : आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास हानीकारक असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा (कारपेट) वापर सर्रासपणे सुरू असल्याचे तसेच हे कारपेट बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे रसायनाच्या वापरामुळे आंबा घातक ठरत असून कृत्रिमरित्या आंबा पिकविला जात असल्याने त्यातील रसाचेही प्रमाण कमी होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
एरव्ही आंब्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्या वेळी कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. आता हा हंगाम संपत आला तरी कॅल्शियम कार्बाइडचा वापर सुरूच असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग वेल्डिंग व इतर कामांसाठी होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी नाही. त्यामुळे ते सहज उपलब्ध होते. मात्र आंब्याच्या मोसमात उगीच नसती झंझट नको म्हणून विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाइड विक्रीबाबत खबरदारी घेतली जाते.
अनोळखी व्यक्तीने चौकशी केल्यास कॅल्शियम कार्बाइड नसल्याचे सांगितले जाते. मात्र नेहमीचे फळ व्यावसायिक आल्यास मात्र पद्धतशीरपणे त्यांना कॅल्शियम कार्बाइड उपलब्ध करून दिले जात आहे.
कॅल्शियम कार्बाइड हे स्फटीक स्वरूपात असते. ते पुडीत बांधून आंब्यांमध्ये ठेवले व हवा लागू दिली नाही तर त्यातून प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्याचे राखेत रूपांतर होते. निर्माण झालेल्या उष्णतेतून आंबे पिकतात. अनेकदा ट्रकमधून माल येतानाच त्यात विशिष्ट झाडाच्या पानात कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या बांधून टाकल्या जातात. त्यामुळे माल पोहोचेपर्यंत निम्मा पिकून जातो. जो माल पिकणे बाकी असतो, त्यावर स्थानिक व्यापारी पुन्हा कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्याची प्रक्रिया करतात.
इथेलॉन वापरास मुभा
आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नये, अशा सूचना आंब्याच्या हंगाम सुरू झाला त्याच वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने विक्रेत्यांना दिल्या होत्या. त्या संदर्भात बैठक घेऊन कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. मात्र तरीदेखील कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत आहे. कॅल्शियम कार्बाइडचा वापर न करता इथेलॉनचा वापर आंबे पिकविण्यासाठी करावा, अशी मुभा विक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे शहरात कोठे कॅल्शियम कार्बाइडचा वापर झाल्याचे आढळून आले नाही, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.
पचन प्रक्रिया बिघडते
जर फळ पिकविताना कॅल्शियम कार्बाइडचा वापर अधिक झाल्यास ते फळ खाणाऱ्यास मळमळ, उलटी, पचन प्रकिया बिघडणे, जुलाब इत्यादी त्रास सुरू होतो.
चार नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
आंबे पिकविण्यासाठी कार्बाइडचा वापर केल्या जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधून चार नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या वर्षी आंबे विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने या वर्षी कार्बाइडचा वापर करण्यास विक्रेते धजावत नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आला.
...तर ६ महिने कारावास
कॅल्शियम कार्बाइड मानवी आरोग्यास हानिकारक आहे. त्याच्या सेवनाने कॅन्सरसारखा दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र वेल्डिंगसाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याने बाजारात ते सहज उपलब्ध होते. मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केल्याप्रकरणी संबंधीतांवर न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो. अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार खाद्यपदार्थात मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थाचा अंश आढळून आल्यास दोषींवर सहा महिन्यांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तसेच दोन ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
असे वापरले जाते कार्बाइड
आंबे पिकण्यापूर्वीच झाडावरून उतरविले जातात. कारण पिकल्यावर आंबा मार्केटमध्ये आणायचा ठरविला तर तो सडण्याची भीती असते. त्यामुळे हा कच्चा, अर्धवट पिकलेला आंबा व्यापारी विकत घेतात. बाजारात पाकिटात मिळत असलेली पावडर दोन-तीन चमचे प्रमाणे घेऊन कागदाच्या पुड्या करून आंब्याच्या ढीगात वेगवेगळ्या कोपºयात दोन-दोन फुटांच्या अंतरावर ठेवून दिल्या जातात. या पावडरच्या उष्णतेमुळेच परिणाम होऊन आंबे लवकर पिकतात.

Web Title: Mango is dangerous due to chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव