मांजा मजबूत असल्याने भाजपाचाच पतंग उंच उडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:35 AM2019-01-14T11:35:31+5:302019-01-14T11:35:36+5:30
गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
जळगाव : आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा मांजा मजबूत आहे. त्यामुळे भाजपाचीच पतंग उंच उडणार आहे,असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. शहरात रविवारी युवाशक्ती फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने खान्देश सेंट्रल मैदानावर आयोजित पतंगोत्सव कार्यक्रमाच्यावेळी महाजन बोलत होते.
पतंगोत्सवाचे उदघाटन सकाळी गिरीश महाजन यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, महापौर सीमा भोळे, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, तहसीलदार अमोल निकम, रायसोनी इन्स्टीट्यूटच्या संचालिका डॉ.प्रीती अग्रवाल, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नगरसेवक प्रशांत नाईक, प्राचार्य ए.जे.मेथ्यू, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, गनी मेमन, सुनील झंवर, राजेंद्र जोशी, अध्यक्ष विराज कावडीया, सचिव अमित जगताप आदी उपस्थित होते.
पतंग उडविताना पशु-पक्ष्यांची काळजी घ्यावी
महाजन म्हणाले, पतंगोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. पतंग उडविताना मांजामुळे कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. गेल्या वर्षी अनेक घटना झाल्या होत्या. त्यामुळे पशु-पक्षी, वाहनधारकांचा मांजामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकमेकांचा पतंग कापताना दुस-याचाच मांजा कापला जातो, अतेव्हा सावधतेने पतंग उडवावेत, असेही आवाहन गिरीश महाजन यांनी केले.
उडल्यानंतरच लगेच कापण्यात आले महाजनांचे पतंग
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महोत्सवात पतंग उडवण्याचा आनंद घेतला. मात्र, पतंग उडाल्यानंतर काही सेकंदातच महाजनांचे पत्र घिरट्या घालायला लागेल. यावेळी मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्यांच्या पतंग्याचा मांजा सांभाळून ढील देण्याचा प्रयत्न केला. तसेच उपस्थितांनीही महाजनांचा उत्साह देखील वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच महाजन यांचे पतंग एका तरुणाने कापले. त्यामुळे महाजनांचे पतंग उंच भरारी घेवू शकले नाही. पतंगोत्सवामुळे मला माझ्या लहानपणातील दिवसांची आठवण पून्हा ताजी झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गीतांनी आणली बहार
पतंगोत्सवादरम्यान सर्वसामान्य जळगावकरांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांनी देखील पतंग उडवण्याचा आनंद घेतला. ‘चली चली रे पतंग, मेरी चली रे...बाई मी पतंग उडवीत होते’,अशा सुमधूर गाण्यांनी पतंगोत्सवात बहार आणली. मांजा व पतंगच्या कटआउटचा सेल्फी पॉइंट लक्षवेधी ठरला. यशस्वीतेसाठी संदीप सूर्यवंशी, उमाकांत जाधव, पियुष हशवाल, समीर कावडीया, आकाश वाणी, तेजस दुसाने, शिवम महाजन, राहुल महाजन, विनोद सैनी, मंजीत जांगीड, भवानी अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.
मशिनमध्ये तर क मळाचे चिन्हच नाही..
पतंगोत्सवात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही पतंग उडविण्याचा आनंद घेतला. तसेच इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन देखील ठेवण्यात आले होते. याची माहितीही गिरीश महाजन यांनी घेतली असता, या मशिनमध्ये तर कमळाचेच चिन्ह नसल्याचे महाजन म्हणाले, त्यांच्या वाक्यावर कार्यक्रमात चांगलाच हंशा पिकला. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, महापौर सीमा भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, यांनी देखील यावेळी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. सर्वच पदाधिकारी व अधिकारी यावेळी एकमकोंचीच पतंग कापताना दिसून आले. प्रस्तावना डॉ.प्रीती अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन व आभार रफिक शेख, राज कांकरिया यांनी केले.महोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांनी पारंपारिक पेहराव करून महोत्सवात सहभाग घेतला. उत्तम वेशभूषा असणा-यांना भेटवस्तू देण्यात आल्या.