खंडणीसाठी डांबून ठेवल्याच्या प्रकरणात पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:32 AM2019-01-20T06:32:37+5:302019-01-20T06:32:45+5:30
चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत असलेले होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांना मदत करणारा धीरज यशवंत येवले याला शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जळगाव : जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्याला पंचवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत असलेले होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांना मदत करणारा धीरज यशवंत येवले याला शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जिल्हा न्या. पी. वाय. लाडेकर यांनी हा निकाल देताना तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांना निर्दोष सोडले.
चाळीसगावचे डॉ. उत्तमराव महाजन यांच्या कॉलेजच्या बांधकामात महाजन व ठेकेदारांचा वाद झाला. तिन्ही ठेकेदारांनी महाजन यांच्याविरुद्ध मनोज लोहार यांच्याकडे अर्ज दिला. गुन्हा दाखल न करणे, तसेच संस्थेतील गैरकारभार बाहेर येऊ न देण्यासाठी लोहार यांनी विश्वासराव पाटील व धीरज येवले यांच्यामार्फत डॉ. महाजन यांच्याकडे ६० लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती २५ लाख रुपये देण्याचे ठरले. खंडणी न दिल्याने लोहार यांनी महाजन यांना एक दिवस डांबले. त्यानंतर, लोहार, निंबाळकर व येवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. १६ जानेवारीला लोहार व येवले यांना न्यायालयाने दोषी ठरविले होते.