शिवाजीनगर उड्डाणपुलाचा तिढा सोडविण्यासाठी चार दिवसांत मनपात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:35+5:302021-08-14T04:20:35+5:30
पालकमंत्र्यांची माहिती : लवकरच तोडगा काढणार, बांधकाममंत्र्यांशीही करणार चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचा बिघडत जात ...
पालकमंत्र्यांची माहिती : लवकरच तोडगा काढणार, बांधकाममंत्र्यांशीही करणार चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचा बिघडत जात असलेला तिढा सोडविण्यासाठी चार दिवसांत महापालिकेत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. अनेक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.
शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहात शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बाबतीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता आदी उपस्थित होते. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पुलाला अडथळा ठरत असलेले विद्युत खांब हटविण्याच्या कामासाठी लागणारा निधी बांधकाम विभागाने उपलब्ध करून द्यावा, असा ठराव गुरुवारी झालेल्या महासभेत करण्यात आला. याबाबतच शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेत, यावर तोडगा काढण्याची तयारी दर्शविली आहे.
मनपातील बैठकीत होणार निर्णय?
शुक्रवारी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसला तरी महावितरण, मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा उपस्थितीत आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत दीड कोटी रुपयांचा निधी कोणी द्यावा व विद्युत खांब हटविण्याचे काम कोणी करावे याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच गरज पडल्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन निधीची मागणी केली जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
लोकवर्गणीतून निधी उभारणार : नगरसेवकांची भूमिका
शिवाजीनगर उड्डाणपुलावरील विद्युत खांब हटविण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने, या पुलाचे काम लांबतच जात आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागातील नगरसेवकांनी विद्युत खांब हटविण्यासाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून उभारण्याची तयारी केली आहे. याबाबत १७ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर भागातील सर्व नगरसेवकांची बैठक होणार असल्याची माहिती नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली. तसेच मनपा आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर खाते उघडण्यात येणार असल्याचेही ॲड. पोकळे यांनी सांगितले.