तब्बल ६ हजार ५०० रूग्ण घरूनच घेत आहेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:24+5:302021-04-20T04:16:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणची सूट दिली असून, संबंधित रुग्णांना चौदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणची सूट दिली असून, संबंधित रुग्णांना चौदा दिवस कोणाचाही संपर्कात न येण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र अनेक रुग्ण हे सातव्या व आठव्या दिवशीच घराबाहेर पडत असून या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ही पहिल्या लाटेच्या तुलनेत दिवसाला सरासरी ५०० ते ७०० रुग्णांनी संख्या वाढत जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या लाटेत कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिला होता. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आला मात्र त्या रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना जिल्हा प्रशासनाने घरीच उपचार घेण्याची सूट दिली आहे. यासाठी रुग्णांना प्रशासनाने काही नियमावली देखील आखून दिली होती मात्र या नियमांचा पूर्णपणे भंग संबंधित रुग्णांकडून होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी न होता वाढतच जात आहे.
गृह विलगीकरणतील रुग्ण ठरू शकतात सुपर स्प्रेडर ?
१. जिल्ह्यात अनेक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, मात्र त्यापैकी अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही किंवा त्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात. यामुळे हे रुग्ण घरातच राहून काही दिवस औषधोपचार घेऊन, कोरोनावर मात करतात. मात्र या रुग्णांना १४ दिवस घरीच थांबणे बंधनकारक आहे. मात्र, हे रुग्ण आपल्याला काहीच झालं नाही म्हणून पाचव्या दिवसापासून बिनदिक्कत बाहेर फिरतात.
२. यामुळे या रुग्णांना जरी त्रास होत नसेल तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच संपर्कात आलेल्या रुग्णांना कमी लक्षणे असतीलच असे होत नाही. हे चित्र केवळ जळगाव शहरा पुरतेच नसून संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
३. गृह विलगीकरणासोबतच एखाद्या रुग्णाने आरटीपीसीआरची चाचणी केल्यानंतर देखील या चाचणीचा अहवाल काही दिवसानंतर जाहीर केला जातो. मात्र अहवाल येईपर्यंत अनेक रुग्ण हे बाहेर फिरतात यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून संसर्ग वाढू नये म्हणून काही उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अशा दुर्लक्ष पणामुळे संसर्ग कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे गृह विलगीकरणतील रुग्ण हे कोरोनाचे सुपर स्प्रे डर ठरण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत एकही कारवाई नाही
गृह विलगीकरणाच्या नियमाचे उल्लंघन करणार्या रुग्णांवर देखरेख करण्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाकडून काही पथके नेमण्यात आली आहेत. मात्र या पथकाद्वारे आतापर्यंत शहरात किंवा जिल्हाभरात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
११ हजार १९३ रुग्णांपैकी ६ हजार ५०५ रुग्ण घरीच घेत आहेत उपचार
जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ हजार १९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ६ हजार ५०५ रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. म्हणजेच एकूण ॲक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत निम्मे रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये केवळ एक हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणाचा पर्याय हा जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील काहीअंशी ताण कमी करणारा असला, तरी रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे हाच पर्याय आता जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.