जळगावात दहावीच्या परीक्षेला अनेक केंद्रांवर सर्रास कॉपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:33 PM2018-03-09T12:33:41+5:302018-03-09T12:33:41+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - माध्यमिक शालांत विभागाकडून सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गुरुवारी इंग्रजीच्या पेपरला अनेक परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले. पेपर सुरु झाल्यानंतर अनेक केंद्रांवर पहिल्या मिनिटापासून तर पेपर संपेपर्यंत वर्गांमध्ये सर्रास कॉपी सुरु होती. त्यामुळे शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाकडून कॉपी मुक्त अभियानाचे कितीही दावे केले असले तरी ते फोल ठरत असल्याचे दिसून आले.
पोलीस बंदोबस्त असतानाही कॉपी
दहावीच्या परीक्षेदरम्यान गुरुवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पेपर झाला. शहरातील बºयाच परीक्षा केंद्रांवर तरुण शाळांच्या उंच भिंतीवर चढून आपला जीव धोक्यात घालून कॉपी पुरवित होते. काही ठिकाणी सुरुवातीला पोलिसांनी कॉपी पुरविणाºयांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही जणांनी पोलिसांचा बंदोबस्त भेदून कॉपी पुरविणाºयांनी विद्यार्थ्यांपर्यंत कॉपी पोहचवल्या. विशेष म्हणजे वर्गांमधील काही पर्यवेक्षकांकडून कॉपी करणाºया विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करता शांततेत पेपर लिहण्याचा अजब सल्ला दिला जात होता.
नूतन मराठा महाविद्यालय, विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात परीक्षा सुरु असताना कॉप्यांचा खच पडलेला दिसून आला. या कॉप्यांचा हुशार विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्त केली.
पोलिसांनी घेतला सावलीचा आधार
परीक्षा कें द्रावर कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस व होमगार्डच्या कर्मचा-यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, हा बंदोबस्त केवळ नावापुरताच असल्याचे दिसून आले. परीक्षा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या परिसरातील सावलीचा आधार घेत खुर्चीवर आराम केला. दरम्यान, ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने परीक्षा केंद्रावर सुुरु असलेल्या गैरप्रकाराचे फोटो घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सावलीचा आधार घेतलेल्या पोलिसांनी तरुणांचा पाठलाग करीत कारवाईचे नाटक केले.
या केंद्रावर सुरु होती कॉपी...
‘लोकमत’च्या चमूने शहरातील नूतन मराठा महाविद्यालय, अॅँग्लो उर्दू हायस्कूल, जि.प.विद्यानिकेतन शाळा, मॉडर्न गर्ल्स स्कूल, का.ऊ.कोल्हे विद्यालयातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली. या ठिकाणी कॉपी सुरु असल्याचे दिसून आले.
पेपर सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासात प्रश्नपत्रिका बाहेर
गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचा वापर वाढल्यामुळे परीक्षेदरम्यान पेपर सुरु झाल्यानंतर मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून अर्ध्या तासात प्रश्नपत्रिका फोडल्या जात आहेत. हेच चित्र गुरुवारी इंग्रजीच्या पेपर दरम्यान पहायला मिळाले. कॉपी पुरविणा-या अनेक युवकांच्या मोबाईलवर प्रश्न पत्रिकेचे फोटो होते. त्यावरुन उत्तरे शोधून उत्तराच्या प्रत झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या.
परीक्षेदरम्यान परीक्षा कें द्राच्या शंभर मिटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शहरातील बºयाच परीक्षा केंद्राच्या शंभर मिटर आतच्या परिसरात झेरॉक्सची दुकाने सुरु होती.