स्वत:च्या कल्पनांना आकार दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 10:29 PM2019-09-15T22:29:42+5:302019-09-15T22:30:40+5:30
विचारमंथन सत्र : प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांचे प्रतिपादन
जळगाव- शासनाच्या स्किल इंडिया, तसेच विविध रोजगार विषयक योजनेची तरुणांनी माहिती घेत त्यातील अडथळे ओलांडून कटिबद्ध राहून मार्ग काढला पाहिजे़ तसेच स्वत:तील कल्पकता ओळखून तिचा व्यवहारात उपयोग केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन एआयसीईटीचे चेअरमन प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांनी केले़ ़
केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयएमआर महाविद्यालयता शनिवारी सकाळी १०़३० वाजता विचारमंथन सत्र पार पडले़ त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर केसीईचे प्रकाश पाटील, सुरेश चिरमाडे, व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एस.टी.इंगळे, डी.जी.हुंडीवाले, केसीई इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.के.पी.राणे, डॉ. शिल्पा बेंडाळे, जलश्रीच्या स्वाती संवत्सर आदींची उपस्थिती होती़
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल
प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात आज अनेक आमूलाग्र बदल आपणास पहावयास मिळत आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाच्या नेमक्या संधी पोहोचत नसल्यामुळे येथे शिक्षणाच्या अनेक समस्या भेडसावत आहे़ उन्नत भारत अभियानाअंतर्गत आर्थिकदृष्टया सधन असणाऱ्यांनी किमान पाच खेडी दत्तक घेतली पाहिजे़ यामुळे प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले़ तसेच शिक्षण क्षेत्रातील मूलभूत समस्यावर मार्ग शोधून त्यातील नेमके पैलूंवर प्रकाश टाकला येईल असे मत डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन ममता दहाड व आभार स्वाती संवत्सर यांनी मानले.
ग्रामीण व शहरातील विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधावा
हल्लीची परिस्थिती लक्षात घेता एका बाजूला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हाताने काम करण्याची सवय आहे, तर दुसरीकडे शहरातला विद्यार्थी ज्याला बटाटे आणि टमाटे कोठून येतात हे माहीत नाही यासाठी या दोघांमध्ये समन्वय घालून थेरोटीकलच नाही तर प्रॅक्टिकल ज्ञान देणे ही आजच्या शिक्षण क्षेत्राची निकड आहे, असेही विचार प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले़ यावेळी विचारमंथन सत्रामध्ये राज्यभरातून प्राचार्य व संस्थाचालक उपस्थित होते़