विद्यापीठाच्या वर्धापनदिनी होणार अनेकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:39+5:302021-06-24T04:12:39+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट संचालक, महाविद्यालय, प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट संचालक, महाविद्यालय, प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी पुरस्कार देऊन अनेकांचा विद्यापीठातर्फे गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था तसेच प्राचार्य, संचालक व विद्यापीठ आस्थापनेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात उत्कृष्ट प्राचार्य/संचालक, उत्कृष्ट महाविद्यालय/परिसंस्था, उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय), उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ, आस्थापना, प्रशाळा) तसेच उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (विद्यापीठ आस्थापना वर्ग १ व २), उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग ३) तसेच उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग ४) तसेच विद्यापीठ शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कारांचा समावेश आहे. सन २०१९-२० व २०२०-२१ या वर्षासाठी तीन प्रतींमध्ये पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. प्रस्ताव कुठल्या वर्षासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या पुरस्कारांचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये केले जाणार आहे.
२२ जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले
संबंधितांकडून प्रस्ताव ई-मेलद्वारे मागविण्यात आले आहेत. प्रस्तावांसोबत संबंधितांचे कर्तव्ये, जबाबदाऱ्या तसेच कौशल्य विकास व वर्तवणूक आदीबाबत एका कागदावर नियंत्रक अधिकारी/विभागप्रमुख/संचालक/प्राचार्य यांच्या स्वाक्षरीनिशी त्यांनी स्वयंस्पष्ट केलेल्या अभिप्रायासह जोडणे बंधनकारक असेल, तसेच २२ जुलैपर्यंत विद्यापीठात पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावयाचे आहे.
‘उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार’ स्वतंत्रपणे होणार प्रदान
विद्यापीठ अधिकार मंडळाने विद्यापीठातील प्रशासकीय व प्रशाळा, शैक्षणिक विभागांमधील तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, परिसंस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेऊन त्यांना ‘उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार’ स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय घेतला आहे.
छाननी समिती गठित केली जाणार
उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची निकषानुसार छाननी करून कुलगुरूंना अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांना अभिप्राय व शिफारशीसह अहवाल सादर करावा लागणार आहे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची छाननी समिती गठित केली जाईल. तसेच या पुरस्काराचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रम होईल. त्यात सपत्नीक कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.