मन्यार कुटुंबाला उद्योगाला शासकीय मदतीसाठी उचलली पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 02:58 PM2020-01-31T14:58:37+5:302020-01-31T15:00:31+5:30
पारंपरिक लाखेच्या बांगड्यांचा उद्योग अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच या वृत्ताला पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी संवेदनशील प्रतिसाद देत स्वत: मन्यार कुटुंबाची तातडीने भेट घेऊन उद्योगासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
महेश कौंडिण्य
पाचोरा, जि.जळगाव : ‘लोकमतने ३० जानेवारी रोजी 'तेरा बंदा बस बिखरा है...अभी तक टूटा नही..' या शीर्षकाखाली येथील मन्यार कुटुंबाचा पारंपरिक लाखेच्या बांगड्यांचा उद्योग अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच या वृत्ताला पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी संवेदनशील प्रतिसाद देत स्वत: मन्यार कुटुंबाची तातडीने ३१ रोजी कार्यालयात भेट घेऊन उद्योगासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या शंभर वर्षांपासून पारंपरिक लाखेच्या बांगड्या बनवण्याचा पारंपरिक उद्योग करणाºया मन्यार कुटुंबाचा आणि या उद्योगाचादेखील अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. त्याबद्दल सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रांताधिकारी कचरे यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवत स्वत: ‘लोकमत’शी संपर्क करून उद्योगाचे मालक निसार सलामू मन्यार आणि त्यांचा मुलगा मोहम्मद अली यांना आपल्या कार्यालयात भेटून आस्थेने त्यांची व त्यांच्या उद्योगात येणाºया अडचणींची एक तास माहिती घेतली.
नियमानुसार त्यांना स्टार्ट अप, मुद्रा लोन, ओबीसी महामंडळामार्फत मिळणारी आर्थिक मदत किंवा इतर शासकीय योजनांमधून काही मदत देता येईल का याची माहितीदेखील त्यांनी तातडीने घेतली. याशिवाय या कुटुंबासाठी उद्योग आधार तयार व्हावेत म्हणून त्यांनी तातडीने संबंधितांना सूचना दिल्या असून, शासकीय मदतीसाठीची पावलं आजच उचलली गेली आहेत.
प्रांताधिकारी कचरे या उद्योगाला प्रत्यक्ष भेट देणार असून त्यांनी या कुटुंबाने इतक्या वर्षांची परंपरा जोपासत हा उद्योग सुरू ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुकदेखील केले. प्रत्यक्ष प्रांताधिकाऱ्यांनी इतक्या आस्थेने चौकशी केल्यामुळे मन्यार कुटुंबाला उज्ज्वल यशाचा एक आशेचा किरण दिसू लागला आहे. ‘लोकमत’ने नामशेष होऊ पाहणाºया या उद्योगाची घेतल्याबद्दल ‘लोकमत’चे ऋण व्यक्त केले.