मार जिवाशी!
By admin | Published: March 15, 2017 12:01 AM2017-03-15T00:01:10+5:302017-03-15T00:01:10+5:30
धुळ्यात डॉक्टरला बेदम मारहाण अटकेतील आरोपीची कोठडीत आत्महत्या
धुळे : जखमी रुग्ण हालचाल करीत असल्याने सीटीस्कॅन करताना अडथळे येत आहे, असे सांगितल्याचा राग आल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी रविवारी रात्री शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रोहन एकनाथ मामुनकर या डॉक्टरला जबर मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेप्रकरणी अटक केलेल्या ९ पैकी प्रदीप सदाशिव वेताळ या २३ वर्षीय संशयित युवकाने मंगळवारी दुपारी शहर पोलीस स्टेशनच्या शौचालयात चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्करबर्डी शिवारात १२ मार्च रोजी चैत्राम उर्फ शत्रू शिवाजी लष्कर (२१) (रा़ चक्करबर्डी) या तरुणाची मोटारसायकल घसरून त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता़ त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले़ अपघात विभागात त्याला स्थलांतरित केल्यानंतर त्याचे सिटीस्कॅन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला़ दरम्यान, सिटीस्कॅन करताना रुग्ण डोके हलवित असल्याने अडथळे येत असल्याचे डॉ. रोहन मामुनकर यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त नातेवाइकानी डॉक्टरांना मारहाण करून साहित्याची तोडफोड केली़
जखमी डॉक्टरला मुंबईला हलविले
डॉ. रोहन मामुनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविले.
शिरपुरातही मोडतोड
शिरपूरमध्ये डॉ. बी. टी. अग्रवाल हॉस्पिटलमध्ये रक्तस्त्राव झाल्याने दीपाली उदय ढोले (वय २८, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) हिच्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली.
अटकसत्र आणि कोठडीत आत्महत्या
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ़ अरुणकुमार रमेश नागे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी डॉ.मामुनकर यांना मारहाण करणाºया विरोधात भादंवि कलम ३५३, ३०७, १४३, १४७, १४९, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ कलमान्वये जमावाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नऊ आरोपी अटकेत
विनोद बापू तागळकर (२२), चंद्रकांत किसन लष्कर (३२), अजय विजय लष्कर (१९), एकनाथ शंकर कुसळकर (२३), लखन सीताराम लष्कर (२३), अंबादास मनोहर कुसळकर (२८), सुनील रामकिसन कुसळकर (३०), छोटू बापू विठेकर (२६), प्रदीप सदाशिव वेताळ (२३) अटकेत.
तपास सीआयडीकडे
न्यायालयाने आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुपारी साडेतीन वाजता प्रदीप सदाशिव वेताळ (वय २३) याने लॉकअपमधील शौचालयात चादरीने गळफास घेतला.आत्महत्येचे वृत्त कळाल्यानंतर चक्करबर्डी परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन गाठले.
डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी कोठडीत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रदीपचा मृतदेह ताब्यात घेतला.
जखमीचा मृत्यू
जखमी चैत्राम लष्कर याचा १३ मार्च रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.