उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यावर मराठा आंदोलन व संपाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:09 PM2018-08-09T13:09:13+5:302018-08-09T13:11:33+5:30
साधेपणाने होणार सोहळा
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ अशा नामविस्तार सोहळ्यावर मराठा समाजाचे आंदोलन व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट असल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा अनिश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यास नामविस्तार सोहळा साधेपणाने साजरा केला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्ताराचे विधेयक काही दिवसांपूर्वी विधानसभेत मंजुर करण्यात आले आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हा सोहळा ११ आॅगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंत्रालयाकडून अध्यादेश प्राप्त झालेले नसले तरी विद्यापीठाने सोहळ्याची तयारी सुरु केली आहे.
सोहळ्यावर मराठा आंदोलन व संपाचे सावट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नामविस्ताराचा कार्यक्रम होणार आहे. मात्र सध्या मराठा आरक्षणावरून राज्यभर आंदोलन सुरु आहेत. त्यातच राज्य सरकारी कर्मचाºयांनी सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यापाठोपाठ धनगर व धोबी समाजाने देखील आरक्षणाची मागणी आहे. ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचे येणे अनिश्चित आहे.
...तर सोहळा साधेपणाने होणार
मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द झाल्यास विद्यापीठ नामविस्तार सोहळा हा साधेपणाने साजरा केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ११ आॅगस्ट रोजी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नामफलक लावण्यात येणार आहे. मुख्य सोहळा मुख्यमंत्र्यांची वेळ उपलब्ध झाल्यानंतर घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.
नामविस्तार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
मंत्रालयाकडून विद्यापीठाला अधिसूचना प्राप्त झालेली नसली तरी नामविस्तार सोहळ्याची तयारी विद्यापीठाकडून सुरु आहे. मुख्य प्रवेशद्वाराला रंग देण्याचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी दुपारी किंवा मध्यरात्री या प्रवेशद्वारावर नाव टाकले जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी कोनशीला तयार करण्याचे काम सुरु आहे. मुख्य इमारतीवर असलेल्या लोखंडी गेटला देखील रंगरंगोटी करण्यात येत आहे. पदवीप्रदान सभागृहाची साफसफाई देखील करण्यात येत आहे. सोहळ्यासाठी नियुक्त केलेल्या विविध समित्यांच्या प्रमुखांकडून रोज कामाचा आढावा घेतला जात आहे.