मराठा आरक्षण लोकसभा, विधानसभेत सुटणारा विषय नाही - गिरीश महाजन
By सुनील पाटील | Published: September 2, 2023 06:22 PM2023-09-02T18:22:43+5:302023-09-02T18:24:08+5:30
आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.
जळगाव : मराठा आरक्षण देण्यासाठी खूप तांत्रिक बाजू आहेत. लोकसभा किंवा विधानसभेत सुटणारा हा विषय राहिलेला नाही. सर्व बाजू समजून घेऊन तोडगा काढू. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवले, मात्र मागच्या अडीच वर्षात लक्ष दिलं गेले नाही. त्यामुळे हे आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.
जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मागील चार,पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. म्हणूनच पोलीस त्यांना घ्यायला गेले होते. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली. जनतेचा रोष इतका होता की त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परंतु तो इतका बेछुटपणे केला की त्याचे समर्थन कोणी करु शकत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही यावर बोलले आहेत. मुलांसा शाळेत जायचं आहे. महिलांना प्रवास करायचा आहे. त्यामुळे एस.टी.बसेसची जाळपोळ व सरकारी मालमत्तेचे नुकसान करु नये असे आवाहन महाजन यांनी केले. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
उध्दव ठाकरेंच्या काळात अनेक घटना
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात अशा अनेक घटना घडल्या, मात्र त्यांनी त्यांची साधी विचारपूस केली नाही किंवा राजीनामा दिला नाही. कोरोनात लोक मरत असताना ठाकरे घराच्या बाहेर निघाले नाहीत. विरोधक आता त्या गावी जाऊन पुतणा मावशीचं प्रेम दाखवत असल्याची टिका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार ही अफवा आहे. असा कुठलाही विषय नसल्याचे महाजन म्हणाले.