मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणार्थीचे मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 08:24 PM2018-08-03T20:24:00+5:302018-08-03T20:24:36+5:30
महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा येथे शिवसेना शहरप्रमुखाचा पवित्रा
पाचोरा, जि.जळगाव : मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी चक्क तहसील कार्यालय आवारातील मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. या प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
या प्रकाराने पोलीस प्रशासन, तहसीलचे कर्मचारी यांची तारांबळ उडाली. या वेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी, किशोर बारवकर यांना टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र महसूल प्रशासनाने उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी संपूर्ण चौकात प्रचंड गर्दी जमली. तत्काळ पालिकेच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करून शिडी लावून बारवकर यांना खाली उतरवले. टॉवरवर बसूनच उपोषण करण्याचा किशोर बारर्वकर यांचा उद्देश होता.
या वेळी मुकुंद बिलदीकर, जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, जि.प सदस्य पद्मसिंग पाटील, उद्धव मराठे, उपनगराध्यक्ष शरद पाटे, तालुकाप्रमुख शरद पाटील, नगरसेवक गंगाराम पाटील, अजयकुमार जयस्वाल, संदीप पाटील, जितू पेंढारकर, पप्पू जाधव, अनिकेत सूर्यवंशी, अॅड.दीपक पाटील, सुधाकर महाजन, सोमा पाटील, सौरभ चेडे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.