मराठी ‘अभिमानगीत’ सहाच कडव्यांचे, विधानभवनात उठलेल्या गदारोळाला ‘राजकीय किनार’ असल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:49 PM2018-03-03T12:49:30+5:302018-03-03T12:51:52+5:30
सत्य दाखवितो ‘रुपगंधा’
जिजाबराव वाघ/ ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि.2 - ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’... मायबोली मराठीची महती सांगणारे हे अभिमान गीत सहाच कडव्यांचे असून यावरुन विधानभवनात उठलेल्या गदारोळाला ‘राजकीय किनार’ असल्याचे स्पष्ट होते. कविवर्य सुरेश भट यांच्या ‘रुपगंधा’ काव्यसंग्राहातील ही कविता आहे. विशेष म्हणजे चौथ्थाच नव्हे तर रुपगंधाच्या तिस-या आवृत्तीतही २४ ओळींचे सहाच कडवे आहेत.
२७ रोजी मराठी राजाभाषा दिनी विधान भवनाच्या प्रांगणात सामूहिकरित्या हे अभिमान गीत गायले गेले. यानंतर 'पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी' हे चार ओळींचे सातवे कडवे वगळल्याचे सांगून विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधत आरोपांची राळ उडवून दिली. वस्तूत: मुळ कविता ही सहाच कडव्यांची असून सातवे कडवे वगळण्याचा प्रश्नच येत नसल्याचा बचाव सरकारने केला. सरकारचे हे म्हणणे पुर्णपणे बरोबर आहे. संगीतकार कौशल इनामदार यांनी सांगितल्यानुसार 'सातवे कडवे एका कार्यक्रमात सुरेश भट' यांनी म्हटल्याचे ठळकपणे अधोरेखित होते.
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरुन विरोधकांनी सरकारले घेरले होते. पाठोपाठ अभिमान गीतावरुनही लक्ष्य केले गेले. त्यामुळे सरकारची 'मराठी विरोधी' प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न विरोधकांडून होत असल्याचा सूर आहे.
'रुपगंधा' भटांची पहिलीच निर्मिती
कविश्रेष्ठ सुरेश भट यांचा रुपगंधा हा पहिलावहिला काव्यसंग्रह. त्याचे प्रकाशन १९६१ म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर एका वषार्ने झाले. त्यामुळेच मायबोलीच्या अस्मितेला सलाम म्हणून कविवर्य सुरेश भटांनी हे कविता लिहिली असावी, असा कयास बांधता येतो. ज्या सातव्या कडव्यावरुन वाद झाला. ते 'आपल्याच घरात हाल सोसते मराठी' या मायबोलीच्या नंतर होत असलेल्या गळचेपीच्या उव्दिग्न भावनेतून सुचल्या असाव्यात. असे मानायलाही जागा आहे.
तिस-या आवृत्तीत २४ ओळींचे सहा कडवे
रुपगंधा काव्यसंग्रहास राज्यशासनाचा व्दितीय पुरस्कार मिळाला होता. प्रथम पुरस्कार कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना तर सुरेश भट आणि दिलीप पुरुषोत्त चित्रे यांना विभागून व्दितीय पुरस्कार दिला गेला. ३० वर्षांनी म्हणजेच १९९१ मध्ये रुपगंधाची दुसरी आवृत्ती निघाली. त्यानंतर अवघ्या आठच वर्षात १९९९मध्ये तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. याचं आवृत्तीत एकुण ७२ कविता असून ४८ क्रमांकावर(पृष्ठ क्र.५८) 'मायबोली' ही अभिमान गीत असणारी कविता आहे. चार ओळीचे सहाच कडवे असून २४ ओळी कवितेत आहे. यातील बहुतांशी कवितांना गेयता आहे. काही रचना मुक्तछंदातीलही आहेत. रुपगंधा मध्येच सुरेश भट यांच्यातील बीजांकुरीत होणा-या कलंदर गझलकाराचे मनोज्ञ दर्शन देखील होते. संग्रहाची सुरुवात 'रुपगंधा' तर शेवट 'स्मरण' कवितेने झाला आहे. संग्रहाच्या एकुण चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
जनता तारी तया कोण मारी..!
'काव्यरसिकांशी चार शब्द' या मनोगतात 'तो १९६१चा सुरेश भट वेगळा आणि हा १९९९चा सुरेश भट वेगळा..!' असे भटांनी म्हटले आहे. 'जनता तारी तया कोण मारी' अशा ओळींनी मनोगतचा शेवट केला आहे. त्यामुळे कालौघातच सातवे कडवे सुरेश भटांना सुचले असावे. हे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांचे म्हणणे संयुक्तिक आहे. हे कडवे स्वत: भट यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. रुपगंधातील अभिमान गीतात त्याचा समावेश केला नव्हता. असेही तावडे यांनी सांगितले आहेच.