दोन्ही लाटेत मार्च ठरला कोरोनासाठी उच्चांकी महिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:19+5:302021-04-02T04:16:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पहिल्या लाटेत सप्टेंबर हा सर्वाधिक रुग्णवाढीचा महिना ठरला होता. यात २० हजारांच्यावर रुग्ण आढळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पहिल्या लाटेत सप्टेंबर हा सर्वाधिक रुग्णवाढीचा महिना ठरला होता. यात २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले होते. मात्र, मार्च महिन्यात कोरोना रुग्णवाढीने हा उच्चांक मोडीत काढला. या ३१ दिवसांत जिल्ह्यात तब्बल २८ हजार १४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गंभीर बाब म्हणजे दोन्ही लाटेतील ही उच्चांकी रुग्णवाढ आहे.
पहिल्या लाटपेक्षा या लाटेत अनेक नवीन बाबी समोर आल्याचे तज्ज्ञांच्या विश्लेषणातून समोर आले आहे. यात १५ फेब्रुवारीपासून झालेली ही रुग्णवाढ थांबतच नसून जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण अधिक वाढले आहे. यात जळगाव शहर व चोपडा तालुक्यात परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. मृतांची संख्या बघितली असता, जळगाव शहर व चोपडा तालुका या दोन्ही भागांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. एकत्रित बाधितांचे प्रमाण हे जळगाव शहरात थेट ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
मार्चमध्ये विविध पातळ्यांवर कोरोना
बाधित : २८,१४०
मृत्यू : २४०
ऑक्सिजनवरील रुग्णवाढ : १,१२६
अतिदक्षता विभागातील रुग्णवाढ : ४०३
सक्रिय रुग्णांमध्ये वाढ : ९,२२८
जळगाव शहरात आढलेले रुग्ण : ८,७०६
जळगाव शहरात झालेले मृत्यू : ७२
चोपडा शहरात आढळलेले रुग्ण ४,८५४
चोपडा शहरात झालेले मृत्यू ३५
सुरुवातीला सौम्य वाटणारी लाट नंतर गंभीर
१५ फेब्रुवारीपासून सुरुवात झालेल्या या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यात एक व्यक्ती नव्हे, कुटुंबच्या कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले. सुरुवातीला सौम्य लक्षणे असलेले हे रुग्ण समोर येत होते. मात्र, मार्च महिन्यात परिस्थिती अत्यंत बिकट बनली. यात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांमध्ये तब्बल ११००ची वाढ नोंदविण्यात आली, तर अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची संख्या ४००ने वाढली. ४०पेक्षा कमी वयाचे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले. दोन वर्षांच्या बाळाचाही कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद मार्च महिन्यात करण्यात आली आहे.
चाचण्या वाढविल्या
मार्च महिन्यात १ लाख ७७ हजार ४५८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. याची बाधित रुग्णांशी तुलना केल्या पॉझिटिव्ह ही वाढून मार्च महिन्यात १५.७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. बुधवारी ११ हजारांवर चाचण्या झाल्या. नियमीत सरासरी ११०० रुग्णांची नोंद होत आहेत.
लक्षणेही नवीन
ताप, सर्दी, खोकला, चव नसणे, वास जाणे, अशा लक्षणांसह आता उायरीयाचीही काही लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. यात शौचास वारंवार जावे लागणे हेही यात एक प्रमुख लक्षण समोर आले आहेत. शिवाय काही तरुणांमध्ये एकाच दिवशी सर्दी होणे किंवा डोके दुखणे अशी स्वतंत्र लक्षणेही समोर येत आहेत. शिवाय तरुणांचेही काही दिवसांतच गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे.