मारहाणीचा खटला जलद न्यायालयात चालविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:05 AM2018-06-18T06:05:51+5:302018-06-18T06:05:51+5:30
वाकडी ता. जामनेर येथे मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
जळगाव : वाकडी ता. जामनेर येथे मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर यासंदर्भातील खटला जलद न्यायालयात चालविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
या प्रकरणात आणखी एक पीडित मुलगा समोर आला आहे. या तीन पीडितांना प्रत्येकी एक लाखाची मदत आणि घरकुले देण्याचे आश्वासन मंत्री दिलीप कांबळे यांनी दिले आहे. मातंग समाजातील मुलांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढल्याप्रकरणी अजित तडवी (२०) व शकनुर तडवी (२३, रा़ वाकडी ता़ जामनेर) यांना शनिवारी अटक केली होती. त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात ईश्वर जोशी आणि प्रल्हाद लोहार यांना यापूर्वीच अटक झालेली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
>५ जुलैला महामोर्चा
या घटनेतील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जळगावात ५ जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. वाकडीतील पीडित कुटुंब या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही रविवारी वाकडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. दरम्यान, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सोमवारी वाकडी येथे भेट देणार आहेत.