दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:43 PM2019-10-23T12:43:21+5:302019-10-23T12:44:09+5:30
कपड्याचे दालन, फराळाच्या साहित्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी
जळगाव : उत्साह, आनंद आणि चैतन्याचा उत्सव असलेला दिवाळी अर्थात प्रकाशपर्वाचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. शुक्रवारी वसूबारसपासून प्रकाशपर्वास सुरुवात होत असून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजापपेठेत सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वच दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे.
दिवाळीसाठी आकर्षक आकाशकंदिल, विविध पणत्या, कपडे, पूजेचे साहित्य व विविध गृहपयोगी वस्तूंनी शहरातील बाजारपेठ सजली आहे. नवरात्रोत्सवापासून बाजारपेठेत सुरू झालेली गर्दी विजयादशमी व आता त्या पाठोपाठ दिवाळीमुळे अद्यापही कायम आहे. दर रविवारी बाजारपेठेत शुकशुकाट असतो. मात्र गेल्या महिन्यापासून रविवारीदेखील बाजारपेठेत सध्या गर्दी होताना दिसत आहे.
कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी
ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे आकर्षक रंगसंगतीचे कपडे व्यावसायिकांनी विक्रीसाठी आणले असून या कपड्यांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. कुर्ता, चुडिदार, जॅकेटस्, पिंं्रटेड कुर्ता, फॉर्मल शर्ट्स, ट्राउझर्स, कॅज्युअल शर्ट्स व ट्राउझर्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स व ब्लेझर्स तसेच लहान मुलांचे विविध प्रकारचे कपडे तसेच साड्या खरेदीसाठी दररोज गर्दी वाढत आहे. अनेक ठिकाणी कपडे, साड्यांवर सूट दिल्या जात असून त्याचा ग्राहक मोठा फायदा घेत आहेत. तसेच बूट व चपलांवरही व्यावसायिकांनी २० ते ४० टक्क्यापर्यंत सवलत दिली आहे.
जागोजागी रांगोळी व पणत्यांची दुकाने थाटली
दिवाळीमध्ये रांगोळी व पणत्यांना सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे नवीन बस स्थानक, एमजी रोड, रिंग रोड, फुले मार्केट, सुभाष चौक, गांधी मार्केट या परिसरातील ठिकठिकाणी रांगोळी व रंगबेरंगी पणत्यांची थाटलेली दुकाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पांढरी रांगोळी १५ रुपये किलो तर विविध रंगातील रांगोळी दुप्पटदराने विक्री होत आहे. तर यंदा मातीच्या पणत्यांसोबत बहुतांश विक्रेत्यांनी आकर्षक पणत्यादेखील विक्रीला ठेवल्या आहेत. यामध्ये लहान व मोठ्या आकाराच्या पणत्या उपलब्ध असून लहान आकारच्या ४० ते ५० रुपये डझन तर मोठ्या आकारच्या पणत्यांची ८० ते ९० रुपये डझनने विक्री होत आहेत.
फराळचे साहित्य खरेदीसाठी लगबग
दिवाळीच्या सणासाठी फराळ म्हणजे घरोघरी हमखास तयार केले जाते. या फराळासाठी लागणारे पोहे, शेंगदाणे, खोबरे, बेसनपीठ, मसाले, रवा, मैदा, साखर, तेल इत्यादी साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानांसह सुपरशॉपवर मोठी गर्दी होत आहे. सोबतच हे फराळ तयार करून घेण्यासाठीहीरात्रीउशिरापर्यंतगर्दीदिसूनयेतआहे.
वाहनांचे बुकिंग जोरात
धनत्रयोदशीला विविध वस्तूंसह वाहने खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून चारचाकी, दुचाकींचे बुकिंग केले जात आहे. यंदा वाहनांच्या खरेदीसाठी मोठा उत्साह असून आतापर्यंत एकाच चारचाकीच्या दालनात अडीचशेच्यावर चारचाकींचे बुकिंग झाले आहे. सोबत दुचाकीचेही बुकिंग जोरात असून पाचशेच्यावर दुचाकींचे बुकिंग झाल्याची माहिती मिळाली.
सुवर्णपेढ्याही गजबजल्या
नवरात्रोत्सवापासून सुवर्ण खरेदीलाही चांगली झळाली आली असून तेव्हापासून सराफ बाजारात सुरू झालेली गर्दी अद्यापही कायम आहे. धनत्रयोदशीला आणखी गर्दी वाढण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.