जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशानंतर मार्केटपुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:38+5:302021-06-28T04:12:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या डेल्टा व्हेरीएंटचे रुग्ण जिल्ह्यात सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुन्हा शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या डेल्टा व्हेरीएंटचे रुग्ण जिल्ह्यात सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुन्हा शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जळगावकरांचा विकेण्ड आता घरातच जाणार असून, रविवार व शनिवारी शहरातील सर्व मार्केट व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर रविवारी शहरातील सर्वच मार्केट बंद ठेवण्यात आले होते. फुले मार्केट, गोलाणी मार्केटमध्ये काही दुकाने उघडली होती. मात्र, त्याठिकाणी मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जावून ही दुकाने बंद केली.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपुर्वी शहरात लावण्यात आलेले निर्बंध कमी केले होते. मात्र, अजून कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटमुळे अडचणी वाढल्या आहेत. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही. तसेच कोरोना नियमांची पायमल्ली होणार नाही यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंतच बाजारपेठा सुरु राहणार असून, विकेण्डला मात्र दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नियम लागू केल्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाने देखील या नियमांची पायमल्ली होणार नाही यासाठी शहरात पुन्हा नवीन पथके तयार करण्यात आली आहेत. बाजारातील गर्दी नियंत्रण करण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आहे.
आदेशानंतरही दुकाने झाली सुरु
रविवारी सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असतानाही महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केटसह इतर भागातील काही दुकाने उघडली होती. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी करून, उघडलेली दुकाने बंद करण्याचा सूचना दिल्या. मनपाकडून रविवारी एकाही दुकानावर कारवाई केली नसून, सर्व दुकानदारांना केवळ विनंती करण्यात आली. मात्र, सोमवारपासून नियमांची पायमल्ली केली गेल्यास मनपाकडून कडक कारवाई केली जाईल असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दुकाने बंद, हॉकर्स मात्र रस्त्यावर
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर रविवारी दुपारी १२ वाजेनंतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता जवळपास सर्वच दुकाने बंद झाली होती. मात्र, दुसरीकडे रविवारी शहरातील अनेक भागांमधील मुख्य रस्त्यालगत हॉकर्सने दुकाने थाटल्याचे चित्र दिसून आले. हॉकर्सला मुख्य रस्त्यालगत व मार्केटमध्ये दुकाने थाटण्यास पुढील सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली असतानाही, रविवारी अनेक हॉकर्सने दुकान थाटली होती. दरम्यान, रविवारी शासकीय सुट्टी असल्याने मनपाचेही केवळ एकच पथकातील कर्मचारी पाहणीला असल्याने हॉकर्सनेही सुट्टीचा फायदा घेत व्यवसाय करून घेतला. ख्वॉजामिया चौक परिसरात तर लहान बाजारच भरल्याचे चित्र दिसून आले.
मनपा प्रशासन कडक कारवाई करण्याचा तयारीत
जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केल्याने या नियमांची पायमल्ली होणार नाही. यासाठी मनपा प्रशासनाकडून नव्याने पथकांची तैनाती केली जाणार असून, निर्बंध काळात दुकानदार, हॉकर्सकडून नियमांची पायमल्ली होणार नाही. तसेच सार्वनजिक कार्यक्रमांमध्येही गर्दी होणार नाही, यावर कटाक्षाने नजर ठेवून कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हा व मनपा प्रशासनाने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाला दिल्या आहेत.