पावसाने दिलेल्या उघडीपीच्या वेळेत बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 09:32 PM2019-10-27T21:32:10+5:302019-10-27T21:32:35+5:30
दिवाळीच्या खरेदीला आला अडथळा : ग्राहकांची गैरसोय, विक्रेत्यांची झाली फजिती
भुसावळ : सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत पाहिजे तशी लगबग रेलचेल दिसली नाही. परंतु पावसाने थोडी उघडीप देताच लक्ष्मीपूजनासाठी लागणारी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात गर्दी उसळली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार तर काही वेळ मुसळधार अशा पावसामुळे नागरिकांची आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
दुपारच्या वेळेस पावसाने थोडीशी उसंत दिल्याने नागरिकांनी लगबगीने दिवाळीची खरेदी केली. येथील आठवडे बाजारात दिवाळी सणानिमित्त दोन पैसे खिशात जातील या आसेपोटी ग्रामीण भागातील अनेक विक्रेते तसेच व्यवसायिकांनी अगदी रस्त्यावर दुकाने थाटली होती. परंतु पावसामुळे बराच वेळ ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्क्यांनी बाजारपेठेत उठाव कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गतवर्षी अवर्षणाच्या स्थितीचे बाजारपेठेवर सावट होते. यंदा मात्र पावसाचे सावट असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर भर देत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र दिवसभरात जेव्हा जेव्हा पावसाचा वेग मंदावला तसेच पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली त्यावेळेची संधी साधत अनेकांनी बाजारपेठ गाठली. यातच मध्येच पाऊस आल्यास ग्राहकांना दुकानांच्या आडोशाचा आधार घ्यावा लागला.
तर किरकोळ विक्रेत्यांना आपला माल प्लॅस्टीकच्या कापडाने झाकण्याची कसरत वारंवार करावी लागली.
आॅनलाइन खरेदीचा परिणाम
दीपोत्सवा साठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी युवकांसह जवळपास सर्वच नागरिक आॅनलाइनचा आधार घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. धावपळीच्या युगात प्रत्येक जण कामात व्यस्त असताना अशा परिस्थितीत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मात्र सर्वच जण वेळ काढून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतच दाखल होत असतात. दरम्यान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूट देण्यात येत आहे.
अंगणी पाणीच पाणी, रांगोळी काढावी कशी ?
पावसामुळे शहरासह परिसरातील रस्ते चिखलमय झाले असून या पावसामुळे घराघरात साथीच्या आजाराचे रुग्ण दिसून येत असून त्यामुळेही दिवाळीचा उत्साह काहीसा कमी झाला असून घराबाहेर चिखलमय परिस्थिती असल्यामुळे नेमकी रांगोळी काढावी तरी कशी ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे मात्र महिलांच्या उत्सवावार पाणी फिरले आहे. भर दिवाळीत रांगोळी विना अंगण पाहताना गृहिणींना खटकणारे ठरत आहे. बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती यंदाच्या दिवाळीत दिसून येत आहे. याला अपवाद फक्त जी मोठी घरे आहेत व त्याघरांना पोर्च आहे, अशा ठिकाणी फक्त रांगोळी काढलेली दिसून आली.