‘प्रभावळ’ ने गाठली अनेक राज्यांची बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:51 AM2019-02-24T11:51:08+5:302019-02-24T11:51:41+5:30
छंदातून झाली उदरनिर्वाहाची सोय
चुडामण बोरसे ।
जळगाव : छंदातून अनेक गोष्टी घडत असतात. जुन्या जळगावातील विठ्ठल पेठेतील रहिवासी असलेल्या खडके कुटुंबाला एक आगळा- वेगळा छंद लागला आहे. हाच छंद जणू त्यांचा पोट भरण्याचे साधन बनला आहे. या खडके बंधूनी देवाच्या मूर्तीसाठी बनविलेल्या प्रभावळ आणि मखर आता देशाच्या अनेक भागात जाऊ लागल्या आहेत. भरीताप्रमाणेच जळगावच्या ‘प्रभावळ’ म्हणून त्यांची आता वेगळी ओळख तयार झाली आहे.
साध्या पत्र्यावर नक्षीकाम करुन त्यावर रसायन ओतून बफींग केले जाते. त्याला सोन्यासारखा लूक दिला जातो. यातून आकर्षक अशा प्रभावळ आणि मखर तयार केले जाते.
विठ्ठल पेठेत राहणारे बंडू सोमा खडके यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले. स्वत:चे काही तरी वेगळे स्थान निर्माण करावे, अशी मनात जिद्द होती. या जिद्दीतून सन २००६ मध्ये त्यांनी देवपूजेसाठी अथवा धार्मिक स्थळी विकण्यासाठी काही छोटे तांबे बनविले. विक्रीसाठी ते स्वत: घेऊन जाऊ लागले. एकदा तांबे विकण्यासाठी ते शिर्डीला गेले होते. साईबाबांचे सिंहासन पाहून त्यांना आपण असे काही बनवू शकतो, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. घरी आल्यावर दिव्यांग असलेले मोठे बंधू राजेश सोमा खडके यांनीही साथ देण्यास होकार दिला. हळू -हळू एक- दोन नाही तर चक्क अनेक सिंहासन बनविण्यासाठी जणू त्यांच्याकडे रांग लागली. ही सिंहासेनही मग आंध्र आणि तामिळनाडूत जाऊ लागली. यामुळे पोटापाण्याचाही प्रश्न काही अंशी सुटला.
जळगावच्या गुरुदत्त नगरातील साईबाबा मंदिर आणि ममुराबाद रोडवरील रेणुकामाता मंदिरात लावण्यात आलेली प्रभावळ खडके बंधूनी तयार केली आहे. याशिवाय शिरपूर येथील रिद्दी- सिद्धी गणपती मंदिरातही अशी छानशी प्रभावळ लावण्यात आली असल्याची माहिती खडके यांंनी दिली.
देवाच्या प्रभावळ आणि मखरमधून पैसा कमी मिळतो. पण यात आम्हाला देवाचे सान्निध्य मिळत असते. कलेची आवडही जोपासली जाते आणि पोटासाठी थोडेफार मिळत असते.. यातच आम्हा भावंडांना समाधान आहे. साईबाबांच्या कृपेनेच हे सर्व घडत आहे.
-बंडू खडके, प्रभावळ तयार
करणारे कारागीर.