पिंप्राळ्यातील बाजार भरतोय निवृत्ती नगरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:30+5:302021-04-15T04:15:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत; मात्र तरीही अनेक भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गल्लीबोळात आता बाजार सुरू केले आहेत. शहरातील पिंप्राळा परिसरातील बुधवारी भरणारा बाजार आता निवृत्तीनगरात भरत असून, याबाबत मनपा प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांसह अनेकांनी तक्रार केल्यावर देखील या ठिकाणी कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी दर बुधवारी शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.
महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील नऊ जागांवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. तसेच आठवडे बाजार देखील रद्द करून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीही शहरातील गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहेत. हरी विठ्ठल भागातील आठवडे बाजार जरी बंद असला तरी या भागातील इतर परिसरांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी खुल्या भूखंडांवर अतिक्रमण करून आता बाजार भरवणे सुरू केले आहे. निवृत्तीनगरात देखील अनेक दिवसांपासून नियमितपणे बाजार भरत आहे. या बाजारात शहरातील दादावाडी, निवृत्ती नगर, खोटे नगर, प्रेम नगर, एसएमआयटी महाविद्यालय परिसर, अष्टभुजा नगर व इतर परिसरातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक भाजीपाला विक्रेत्यांना मास्क देखील लावलेला नसतो.
मनपाकडून कारवाई नाहीच, पावत्या फाडण्याचे काम मात्र सुरू
निवृत्तीनगरात भरत असलेल्या बाजाराबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र मनपा प्रशासनाकडून या भागात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. या ठिकाणी बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांकडून विक्रेत्यांच्या पावत्या फाडण्यात आल्या. यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरातील विशिष्ट भागातीलच विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याचाही आरोप आता मनपा प्रशासनावर केला जात आहे. या भागात विक्रेत्यासह शेकडो नागरिकांचीही गर्दी असते. तरीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.