केळी बाजारभावाची मुसंडी अन् वादळाने केली मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:17+5:302021-05-28T04:14:17+5:30
केळीचे भाव बाजारभाव समितीकडून बोर्डावर १४५० रु. प्रतिक्विंटलपर्यंत खिळवण्यात आले असले तरी, ४०० ते ४५० रु. प्रतिक्विंटलपर्यंत व्यापाऱ्यांनी घसरगुंडी ...
केळीचे भाव बाजारभाव समितीकडून बोर्डावर १४५० रु. प्रतिक्विंटलपर्यंत खिळवण्यात आले असले तरी, ४०० ते ४५० रु. प्रतिक्विंटलपर्यंत व्यापाऱ्यांनी घसरगुंडी करत ७५० ते ८०० रु. पर्यंत कालपर्यंत प्रत्यक्षात केळीभावाची कोंडी करण्यात आली होती. मात्र, बऱ्हाणपूर केळी बाजारात केळीभावाने १९५० रु. प्रतिक्विंटलपर्यंत अचानक उसळी घेतल्याने वादळी पावसाचे तांडव झालेल्या खिर्डी, ऐनपूर, विटवे, निंबोल, धामोडी, वाघाडी, शिंगाडी, परिसरात गुरुवारी १४५० रु. प्रतिक्विंटल भावाने मुसंडी मारली होती. किंबहुना, या आपद्ग्रस्त भागात आज १ हजार ४५० रु. प्रतिक्विंटल भावाने अनेक केळीबागांमध्ये कापणीसाठी ट्रक उभे असताना क्रूर नियतीची दृष्ट लागली.
सायंकाळी दीड तास चाललेल्या या वादळी पावसाच्या तांडवाने झाडे उन्मळून पडल्याने तथा वीजखांब पडून वा वाकून वीजतारा तुटून पडल्याने अर्धवट भरलेले केळीमालाचे ट्रक शेतीशिवारात तसेच खोळंबून होते. अर्थात लॉकडाउनच्या तीन-चार महिन्यांपासून आज प्रथमच केळीबाजारभावाने अचानक घेतलेल्या मुसंडीला वादळी पावसाच्या तांडवाने थोपवल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबाशी क्रूर नियतीनेही थट्टाच केल्याची शोकांतिका आहे.