हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड

By अमित महाबळ | Published: May 27, 2023 07:44 PM2023-05-27T19:44:50+5:302023-05-27T19:45:35+5:30

ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे.

marksheet of 54 000 students examination result uploaded on digilocker in jalgaon | हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड

हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड

googlenewsNext

अमित महाबळ, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांची डिसेंबर, २०२२ परीक्षेची गुणपत्रके डिजिलॉकरच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. आजपर्यंतच्या आकडेवारीत ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे.

विद्यापीठाने डिजिलॉकरवर अपलोड केलेल्या गुणपत्रिकांमध्ये डिसेंबर २०२२ च्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए. प्रथम वर्ष आणि बी. टेक. हे पदवी अभ्यासक्रम तसेच एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.बी.ए., एम.सी.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या परीक्षांचा निकाल जाहीर झालेल्या १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांपैकी ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा एबीसी आयडी व विद्यार्थ्यांनी दिलेला आधार जुळत असल्याने या विद्यार्थ्यांचे क्रेडिट ट्रान्सफर झाले आहेत.
 
उर्वरित ६२ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ nmuj.digitaluniversity.ac यावर ई-सुविधा, स्टुडंट प्रोफाइलमध्ये लॉगीन करून एबीसी आयडीद्वारे आधारकार्ड नंबर अपडेट करावा. जेणेकरून त्यांचीही गुणपत्रके डिजिलॉकरमध्ये (www.digilocker.gov.in) दिसू शकतील. एम.के.सी.एल.चे अमोल पाटील यांनी ही कार्यवाही परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक यांच्या निर्देशान्वये केली आहे.

आतापर्यंत पदवी प्रमाणपत्रे अपलोड केली जायची. विद्यापीठात १९९४ पासूनच्या साडेपाच लाख पदवी आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार गुणपत्रके डिजिलॉकरवर अपलोड करायची आहेत. डिसेंबर, २०२२ परीक्षेच्या निकालापासून याची सुरुवात झाली आहे. तीन महिन्यांपासून हे काम सुरू होते. उन्हाळी परीक्षांचा निकाल जाहीर होताच पुढील एक महिन्यात तीही गुणपत्रके अपलोड केली जातील. विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम, क्रेडिट पॉइंट एकसमान असतील. त्या दृष्टीने भविष्यात गुणपत्रिकेत बदल केले जातील, अशी माहिती कबचौउमविचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली.

Web Title: marksheet of 54 000 students examination result uploaded on digilocker in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.