मरकीट, शहामृग आणि बिग फाईव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:58 PM2018-02-18T21:58:44+5:302018-02-18T21:59:04+5:30

प्राणीसंग्रहालयात बेंगाल टायगर पाहिल्यावर भारतीय भेटल्याचा अत्यानंद झाला

Marquee, ostrich and Big Five | मरकीट, शहामृग आणि बिग फाईव्ह

मरकीट, शहामृग आणि बिग फाईव्ह

Next

दक्षिण आफ्रिकेची पर्यटकांना ओढ दोन प्रमुख गोष्टींसाठी असते. पहिली म्हणजे तिथले निसर्गसौंदर्य, घनदाट जंगले, वेगवेगळी रूपे ल्यालेल्या पर्वत रांगा आणि निळाशार समुद्र आणि दुसरे म्हणजे अभयारण्य, जंगलातील पशु-पक्ष्यांचा मुक्त वावर... बिग फाईव्ह पाहायला मिळाले काय? हा प्रश्न आफ्रिकेला जाऊन आलेल्या पर्यटकाला हमखास विचारला जातो.
निसर्गाचा आविष्कार असलेले सिंह, गेंडा, रेडा, हत्ती आणि चित्ता हे प्रमुख पाच राष्टÑीय प्राणी अभयारण्यात दिसतात. अर्थात सिंह आणि चित्ता दिसायला नशीब लागते हे खरेच. आम्हाला चित्ता प्राणीसंग्रहालयात बघावा लागला आणि बाकी चौघे अभयारण्यात मुक्त वावरताना बघण्याचा स्वर्गीय आनंद मिळाला.
आफ्रिकेत भौगोलिकदृष्ट्या उंच पठार आणि मैदानी भागातील गवताळ प्रदेश आहे. अशा वैविध्यपूर्ण रचनेमुळे वनस्पती जीवन, प्राणीजीवन आणि पक्ष्यांचे असंख्य प्रकार याठिकाणी बघायला मिळतात. जंगलांनी पर्वतांना सजविले, नटविले आहे. वर्षभर निसर्ग जणू नटलेला असतो. आतापर्यंत दूरचित्रवाणी वा चित्रपटात पाहिलेले आफ्रिकेचे जंगल प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद अवर्णनीय असाच आहे. जंगले, अभयारण्ये दोन प्रकारची दिसून आली. एक म्हणजे जागतिक पर्यावरण संरक्षण मोहिमेचा भाग म्हणून संरक्षित वन्यप्रदेश तर दुसरीकडे पर्यटकांसाठी खास बनविलेल्या सुसज्ज रिसॉर्टच्या मालकीचा खासगी वन्यप्रदेश असे त्याचे स्वरूप असते. आम्ही पिलानीसबर्ग नॅशनल पार्कला भेट दिली. बाकुबंग या सुसज्ज खासगी रिसॉर्टमध्ये दोन दिवस राहिलो. जंगलाच्याच एका भागात हे रिसॉर्ट होते. अर्थात रात्रीच्या वेळी वीजप्रवाह सोडलेल्या संरक्षण कुंपणामुळे पर्यटकांना सुरक्षित राहता येते. प्राण्यांच्या डरकाळ्या सभोवती ऐकू येत असल्या तरी आपण आरामात झोपू शकतो, हे त्याचे वैशिष्ट्य. पहाटे सहा वाजता जंगल सफारी सुरू होते. उघड्या जीप, मेटॅडोरमधून पर्यटक गटा-गटाने बाहेर पडतात. वाहनचालक हाच गाईड असल्याने वॉकीटॉकीच्या साहाय्याने तो इतर वाहनचालकांच्या संपर्कात असतो. प्राणी हमखास कोठे दिसतील, हे त्यांना ठावूक असल्याने ते तीन-चार तासांच्या या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करतात.
अविस्मरणीय असा प्रसंग म्हणजे मोकळ्या जंगलात फिरणाºया दोन सिंहाचा आम्ही वाहनातून जीव मुठीत घेऊन केलेला अर्ध्या तासाचा पाठलाग...मानेभोवती भरगच्च आयाळ, रुबाबदार आणि सोनेरी रंगाचा हा सिंह खरोखर जंगलाचा अनभिषिक्त राजा असल्याचे ठसवतो. सायंकाळच्यावेळी हत्तींमधील लढाई आणि त्यांच्या डरकाळ्या भयकंपीत करीत होत्या.
त्यामानाने मुंगुसासारखा दिसणारा पण मागच्या दोन पायांवर उभे राहणाºया ‘मरकीट’ या छोट्या प्राण्यांची बिळे आणि त्यांची प्रात:कालीन सभा देखणी होती. आऊटश्रून येथे आॅस्ट्रिच पार्कला दिलेल्या भेटीत शहामृग या धिप्पाड पक्ष्याला पाहून आणि त्याची माहिती ऐकून आश्चर्यचकीत झालो. प्राणीसंग्रहालयात बेंगाल टायगर पाहिल्यावर भारतीय भेटल्याचा अत्यानंद झाला. (क्रमश:)
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Marquee, ostrich and Big Five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव