विवाह, सत्यनारायणपासून तेरव्यापर्यंत ऑनलाइन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:40+5:302021-06-23T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे दैनंदिन कामकाजापासून जनजीवनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यातच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे दैनंदिन कामकाजापासून जनजीवनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यातच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने लग्नसोहळ्यापासून, धार्मिक कार्यक्रम व अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमांवरदेखील प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आले होते. अशावेळी पूजापाठाचे कार्यक्रम एकतर पुढे ढकलावे लागले किंवा गर्दी न करता घ्यावे लागले, तर अनेकांनी आता कोरोनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीनेच धार्मिक कार्यक्रम उरकण्याची डिजिटल पद्धत सुरू केली असून, जळगाव जिल्ह्यात अनेक धार्मिक विधी याच प्रकारे ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक लग्नांचे मुहूर्त पुढे ढकलण्यात आले. वर्षभर थांबल्यानंतर कोरोनाची परिस्थिती निवडल्यानंतर नवीन मुहूर्त साधण्याची तयारी अनेकांनी केली होती. मात्र, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे नागरिकांचा नाईलाज झाला. अगोदरच मुहूर्त हुकल्याने यंदा कोरोनाची परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या नियमात राहूनच अनेकांनी लॉकडाऊन काळात लग्नकार्य व घरातील इतर विधी उरकून घेतले. लग्नकार्यात व दहावा, तेराव्याच्या विधीवर देखील बंधने असल्याने गर्दी कमी करून कोरोनाला टाळण्यासाठी पुरोहितांनीही डिजिटल रूपातच येऊन सर्व विधी पार पाडले. एखादा स्मार्ट फोन, टॅब व लॅपटॉपच्या साहाय्याने ऑनलाइन येऊनच पुरोहित मंडळींनी वधू-वरांना आशीर्वाद दिले व विधीदेखील पार पाडले. ही ऑनलाइन पद्धत आता जीवन पद्धतीत रुजायला सुरुवात होत आहे. लग्नकार्यासोबतच घरशांती, सत्यनारायणाची पूजा, वाहनाची पूजा असे धार्मिक विधी देखील ऑनलाइन पद्धतीनेच केले जात आहेत.
सत्यनारायण, घरशांतीचे कार्यक्रम ऑनलाइन करण्यावर भर
लग्नकार्य, तेराव्याचे कार्यक्रम हा मोठा विधी असल्याने अनेक पुरोहित जागेवरच जाऊन पूजा करतात, तर काही जण ऑनलाइनचा पर्याय स्वीकारतात. मात्र, लहान कार्यक्रमांचे विधी आता ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. ग्रामीण भागात हा ट्रेंड नसला तरी शहरी भागात ही पद्धत आता सुरू झाली आहे. सत्यनारायण, घरशांती, रुपये-नारळाचा कार्यक्रम, साखरपुडा, वाहनांची पूजा ही कामे अनेक पुरोहित ऑनलाइन पद्धतीनेच करून घेत आहेत.
पूजेला आले तरी मास्क
- अनेक पुरोहित मात्र आजही जागेवरच जाऊन पूजा-विधी करण्यावर भर देत आहेत. मात्र, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता घेतात. अनेक पुरोहित पूजा-विधींदरम्यान देखील मास्क कायम ठेवतात.
-पूजा करणाऱ्या पुरोहितांसह पूजेला बसणारे देखील मास्क वापरत असतात. यामुळे विधीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे पुरोहितांचे म्हणणे आहे. आजच्या काळात मास्क हे मुख्य शस्त्र असल्याने त्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत हा झालाच पाहिजे, असे मत पुरोहितांकडून व्यक्त केले जात आहे.
काय म्हणतात विधी व्यावसायिक
काळानुसार प्रत्येकाने बदलण्याची गरज आहे. व्यक्तीसोबतच काही पद्धतींमध्येदेखील बदल करणे गरजेचे आहे. कोरोनाची समस्या असल्याने प्रत्येकाने मास्कचा वापर करून, गर्दी टाळली पाहिजे व गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रम हा चांगला पर्याय आहे.
-स्वप्नील जोशी, पुरोहित
काही विधी हे ऑनलाइन पद्धतीने केले तरी काही हरकत नाही. मात्र, मोठे विधी करण्यासाठी उपस्थित राहण्याशिवाय पर्याय नाही, अशा ठिकाणी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांत राहून पूजा केली जात आहे, तर ज्याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे. त्याठिकाणी ऑनलाइनचाही पर्याय आहे.
-विठ्ठल कुलकर्णी, पुरोहित