चोपडा येथे दोन अल्पवयीन बहिणींचे रोखले विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:06 PM2019-05-05T23:06:05+5:302019-05-05T23:08:06+5:30
चोपडा येथील दोघा अल्पवयीन बहिणींचे विवाह होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचल्याने त्वरित संबंधितांना समज देत विवाह थांबविण्यात आले.
पी.आर.माळी
चोपडा, जि.जळगाव : येथील दोघा अल्पवयीन बहिणींचे विवाह होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचल्याने त्वरित संबंधितांना समज देत विवाह थांबविण्यात आले.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, चोपडा शहरात ६ रोजी दोघा बहिणींचा विवाह सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे ठरविण्यात आला होता. मात्र या मुली अल्पवयीन आहेत याची जाणीव असलेल्या नातेवाईकांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला व बालकल्याण सहायक कक्षाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती कळवली.
५ रोजी सदर माहिती प्राप्त होताच तत्परतेने या विभागाने चोपडा गाठत सदर प्रकार चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना कळविला. दोन्ही पक्षाकडील नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवून सहायक पोलीस निरीक्षक यादवराव भदाणे यांनी दोघांना सोमवार, दि. ६ मे रोजी आयोजित केलेल्या विवाहातील दोन्ही मुली अल्पवयीन आहेत, अल्पवयीन मुलींचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. म्हणून तो थांबवावा, असे समज पत्र दिले. यामुळे दोन्हीकडील मंडळींना आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्याने सदर विवाह थांबविण्यात आला.
सदर विवाह थांबविण्याकामी जळगावच्या महिला व बालकल्याण सहायक कक्षाच्या प्रमुख शोभा हांडोरे, विद्या सोनार यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांना चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहायक पोलीस निरीक्षक यादवराव भदाणे, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, रेणूका प्रसाद, भारती पाटील यांनी सहकार्य केले.