पाचोरा येथे विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:54 PM2020-02-22T18:54:37+5:302020-02-22T18:58:38+5:30
इंदिरा नगरातील शिक्षक पत्नी सृष्टी स्वप्नील साळुंखे या विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.
पाचोरा, जि.जळगाव : शहरातील इंदिरा नगरातील शिक्षक पत्नी सृष्टी स्वप्नील साळुंखे (वय २६) या विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे व नणंद यांना २२ रोजी अटक केली. या विवाहितेने २१ रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सूत्रांनुसार, इंदिरानगर भागात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक स्वप्नील वनराज साळुंखे यांच्या पत्नी सृष्टी स्वप्नील साळुंखे हिने २१ रोजी आपल्या लहान मुलासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी विवाहितेच्या आई ललिताबाई सतीश पाटील (रा.पिळोदा, ता.शिरपूर, जि.धुळे, ह.मु.बडोदा) यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली की, ‘मुलगी वैशाली उर्फ सृष्टी हिला सासरची मंडळी ही लग्न झाल्यापासून वारंवार छळ करीत होती. लग्नात तुझ्या माहेरच्यांकडून हुंडा कमी मिळाला आहे. त्यामुळे माहेरून पाच ते सहा लाख रुपये घेऊन ये, अशी वारंवार मागणी करून तिला त्रास द्यायचे. पती स्वप्नील वनराज साळुंखे हे तिला मारठोक करून शारीरिक व मानसिक छळ करत होते. याबाबत मुलीने वारंवार फोनवर व प्रत्यक्ष परिस्थिती मला सांगितली होती. मात्र ही परिस्थिती सुधारत नसल्याचे पाहून व यास कंटाळून मुलीने स्वत:ला जीवन जगण्याची इच्छा नाही, असे पाहून आत्महत्या केली आहे.’
या प्रकरणी पती स्वप्नील वनराज साळुंखे, सासरा वनराज चिंधा साळुंखे, सासू शोभाबाई साळुंखे व नणंद हर्षदा उदय भदाणे यांच्याविरुद्ध मुलीस शारीरिक मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.