कुºहे येथे शहीद राकेश शिंदे यांचा गावकऱ्यांना अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:27 AM2020-07-26T00:27:12+5:302020-07-26T00:29:12+5:30
सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कुºहे (पानाचे) येथील भारतमातेचे सुपुत्र राकेश शिंदे यांनी मातृभूमीचे रक्षण करताना बाजी लावली आणि शत्रूला परतावून लावण्यात आपले योगदान दिले.
उत्तम काळे ।
भुसावळ, जि.जळगाव : सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कुºहे (पानाचे) येथील भारतमातेचे सुपुत्र राकेश शिंदे यांनी मातृभूमीचे रक्षण करताना बाजी लावली आणि शत्रूला परतावून लावण्यात आपले योगदान दिले. युद्धात विजयी ठरलेला हा योद्धा सीमा रक्षक म्हणून काश्मीर येथील कुंज येथे सेवा बजावत असतानाच २७ फेब्रुवारी २००० रोजी शहीद झाला. मात्र या शूरवीराच्या स्मृती गावकऱ्यांनी मंदिराच्या रुपाने जतन करून ठेवल्या आहेत आणि आजही त्या मंदिरात गावकरी शहीद राकेश शिंदे यांना सन्मानाने अभिवादन करतात.
शहीद राकेश शिंदे यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. तरीही आई आणि मोठे भाऊ सुरेश उर्फ अण्णा शिंदे यांच्यासह इतर दोन भाऊ मोलमजुरी करून घराचा गाडा ओढत होते. राकेश यांना शिक्षण देऊन मोठे करू, असा आशावाद आईला व मोठ्या भावांना होता. घरची परिस्थिती बघून राकेशनेही बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निश्चय केला.
१९९५ साली १७ मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून ते भरती झाले. आणि मोठ्या हिंमतीने कारगील युध्दात त्यांनी कर्तव्य बजावले.
अंगाला यायचे शहारे
राकेश सीमेवर घडत असलेल्या घटनांचे सुट्यांमध्ये घरी आल्यानंतर वर्णन करायचे त्यावेळी सर्वांच्या अंगावर शहारे येत, असे आई अनुसयाबाई शिंदे सांगतात. एकदा तर बंदुकीच्या गोळ्या दोन्ही पायातून गेल्याची आठवण त्यांनी सांगितली. ती आजही स्मरणात असल्याचे त्या नमूद करतात.
भुसावळात आहे स्मारक
राकेश शहीद झाल्यानंतर भुसावळचे माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांनी, २००१ साली तत्कालीन नगराध्यक्ष रेखा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नाहाटा चौफुलीजवळ त्यांचे स्मारक उभारले. हे स्मारक आजही कुºहे (पानाचे) गावासह परिसरातील तरुणांना प्रेरणा देते.
शेतामध्ये बांधले मंदिर
कुºहे (पानाचे) येथे त्यांच्या मालकीच्या शेतात शहीद राकेश शिंदे यांच्या स्मृतीत मंदिर उभारण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम होतो. त्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर असतात.
पेट्रोलपंपाचा प्रस्ताव रखडलेलाच
केंद्र सरकारने शहीद जवानाच्या परिवाराला किंवा वारसाला पेट्रोलपंप देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी शहीद राकेश यांच्या आईच्या नावाने पेट्रोलपंपाचा प्रस्ताव पाठवला. मात्र जन्मतारखेचा दाखला मिळाला नाही. त्यामुळे अद्यापही प्रस्ताव रखडलेला आहे, अशी खंत अनुसयाबाई शिंदे यांनी व्यक्त केली.